संडे स्पेशल मुलाखत- नर्मदा विस्थापीतांच्या न्याय लढ्याला बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 12:52 IST2021-01-10T12:52:47+5:302021-01-10T12:52:55+5:30
अमेरिकेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनच्या पुरस्कार २१ वर्षांपासून सातपुड्यात नर्मदा आंदोलनाच्या माध्यमातून लढा देत आहे. युवा अवस्था त्यातच गेली. चळवळीच्या या लढ्याची दखल घेतली गेल्याने समाधान आहे. -चेतन साळवे.

संडे स्पेशल मुलाखत- नर्मदा विस्थापीतांच्या न्याय लढ्याला बळ
मनोज शेलार
लोकमत न्यूज नेटवर्क
गेल्या २१ वर्षांपासून विस्थापीतांना न्याय देण्यासाठी लढत आलो आहे. दऱ्याखोऱ्यातील वंचितांना जेंव्हा न्याय मिळतो तेंव्हा आपल्या कामाचे चिज झाल्याचे समाधान असते. आजही या भागात काम करण्यासारखे बरेच काही आहे. माझ्यासारख्या युवकाला ते खुणावत आहे. माझ्या गेल्या २१ वर्षातील कार्याची अमेरिकेच्या महाराष्ट्र फाऊंडेशनने घेतलेली दखल वंचितांच्या न्याय लढ्यासाठी बळ देणारी असल्याची माहिती अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा यंदाचा युवा कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झालेले आणि नर्मदा बचाव आंदोलनाचे सक्रीय कार्यकर्ते चेतन साळवे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.
नर्मदा आंदोलनात आपण कधीपासून आहात?
पूर्वी पासूनच मला वंचितांच्या न्याय हक्कासाठी लढण्याची ओढ होती. योगायोगाने मी नर्मदा आंदोलनाशी जोडलो गेलो. आज त्याला २१ वर्ष झाली आहेत. मेधाताई पाटकर यांचे नेतृत्व आणि त्यांचे विचार प्रभावीत करतात. त्यांच्या विचारनेच आज मी काम करीत असून वंचीतांना आणि बाधीतांना न्याय देण्यासाठी काम करीत आहे. माझ्या सारख्या युवा कार्यकर्त्यास नर्मदा आंदोलनात काम करण्यास वाव असून ती एक मोठी संधी असल्याचे मी मानतो.
काम करतांना काय अडचणी आल्या?
सातपुड्याच्या द-याखो-यात विस्थापीतांना न्याय देण्यासाठी विविध कामे केली. त्यात सरदार सरोवर विस्थापीतांच्या पुनर्वसनाचे काम, शासनाची जमीन पहाणी व पसंती, पुनर्वसन नियोजन समिती, जीवन शाळांना सहकार्य, नर्मदा फुगवट्यातील पाणलोट क्षेत्रात मासेमारी संस्था स्थापन करून रोजगार मिळवून देण्यासह आलेली प्रत्येक जबाबदारी पार पाडली आहे. हे काम करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. काम करतांना अडचणी येतात हे गृहीत धरूनच या कार्याला झोकुन दिले आहे.
महाराष्ट्र फाऊंडेशन...
अमेरिकेत स्थायिक झालेल्या महाराष्ट्रातील लोकांनी हे फाऊंडेशन स्थापन केले आहे. दरवर्षी विविध कॅटेगरीतून फाऊंडेशनतर्फे पुरस्कार दिले जातात. त्यासाठी महाराष्ट्रात एक समिती आहे ती समिती प्रत्येक कॅटेगरीतील तीन नावे पाठवते. अमेरिकेत त्यातील एक नाव अंतीम केले जाते. यंदा युवा कॅटेगरीतून चेतन साळवे यांची निवड करण्यात आली आहे.
व्हीडीओ व्हॅालंटरी..
व्हीडीओ व्हॅालंटरी या संस्थेसोबत चेतन साळवे हे २०१५ पासून जोडले गेले आहेत. समुदाय संवाददाता म्हणून ते काम करतात. बेस्ट इम्पॅक्ट व बेस्ट व्हिडीओचे दोन राष्ट्रीय पुरस्कार साळवे यांना दिले गेले आहेत.
कार्याचा प्रचार...
महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे यंदा कोरोनामुळे पुरस्कार वितरण होणार नाही. पुढील वर्षी पुरस्कारार्थींना गौरविण्यात येणार आहे. परंतु त्यांच्या कार्याची व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून प्रचार व प्रसार केला जाणार आहे. त्याचे चित्रीकरण नुकतेच पुणे येथे झाले.