राज्य उत्पादन शुल्कच्या पथकावर दगडफेक; अक्कलकुवा तालुक्यातील घटना
By रमाकांत.फकीरा.पाटील | Updated: December 7, 2023 18:12 IST2023-12-07T18:12:51+5:302023-12-07T18:12:58+5:30
राज्यस्तरीय पथकाकडून कारवाई सुरू असताना प्रकार.

राज्य उत्पादन शुल्कच्या पथकावर दगडफेक; अक्कलकुवा तालुक्यातील घटना
नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील आमलीबारी गावाजवळ अवैध मद्य वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई सुरू असताना पथकावर दगडफेक केल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी घडला. यादरम्यान संशयितांकडून मुद्देमाल पळवण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु घटनास्थळी पोलिस अधिकारी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यस्तरीय पथकाकडून बुधवारी अक्कलकुवा ते मोलगी रोडवर अवैध मद्य वाहून नेणाऱ्या वाहनावर कारवाई सुरू होती. आमलीबारी गावाजवळ सुरू असलेल्या कारवाई दरम्यान काहींनी पथकावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. दगडफेक होत असल्याने अधिकारी बचावाचा पवित्रा घेत होता.
याचा लाभ उठवत एकाने मुद्देमाल पळवून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु पथकातील जवानांनी शिताफीने वाहन आणि मुद्देमाल ताब्यात घेतला. यादरम्यान पथकाने तिघांना ताब्यात घेतले होते. याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे जवान शाहरुख रुबाब तडवी यांनी अक्कलकुवा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अनिल आपसिंग वसावे (३२) रा. उमरागव्हाण, ता. अक्कलकुवा, राहुल बाज्या वसावे (३१) रा.चिवलउतार, वसंत सिपा वसावे (२५) रा. खुंटागव्हाण, ता. अक्कलकुवा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक देवीदास वडघुले करत आहेत.