जिल्ह्यात 78 ठिकाणी केला जाणार कोरोना लसींचा साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 12:28 IST2020-12-14T12:28:06+5:302020-12-14T12:28:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जानेवारी महिन्यात कोरोना लसीचा डोस जिल्ह्यातील साधारण १२ हजारांच्या जवळपास कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. मोठ्या ...

जिल्ह्यात 78 ठिकाणी केला जाणार कोरोना लसींचा साठा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जानेवारी महिन्यात कोरोना लसीचा डोस जिल्ह्यातील साधारण १२ हजारांच्या जवळपास कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. मोठ्या प्रमाणावर शासनाकडून पुरवठा केल्या जाणाऱ्या या लसींचा साठा करण्याची तयारी आरोग्य प्रशासनाने केली असून, यासाठी डिस्ट्रिक्ट व्हॅक्सिन स्टोरेज जिल्हा परिषदेच्या आवारात तयार झाले आहे.
जिल्ह्यातील या प्रमुख स्टोरेजसोबत सर्व सहा तालुक्यात ७७ ठिकाणी आरोग्य विभाग पूर्वीपासून लसींचा साठा करतो आहे. याठिकाणीही क्षमतावाढीसह तयारी सुरू झाली आहे. एकूण ७८ ठिकाणी साठा होणारी कोरोनाची लस खराब होऊ नये यासाठी प्रशासनाने विजेचा २४ तास पुरवठा करण्याचे वीज वितरण कंपनीला सूचित केले आहे. प्रामुख्याने दुर्गम भागात होणाऱ्या लसीकरणासाठी विशेष व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. लसीकरण होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या याद्याही अंतिम टप्प्यात आहेत.
शीतगृहांची जय्यत तयारी
जिल्हा परिषदेच्या आवारात तयार केलेल्या जिल्हा शीतगृहात एक हजार ५०० लीटर क्षमतेचे १५ आयलर मागवण्यात आले आहेत. तसेच ७७ ठिकाणच्या रेफ्रीजरेटरची तपासणी करून नवीन काय हवे ते मागवले जात आहे. प्रत्येक ठिकाणी २४ तास वीज दिली जाईल याचेही नियोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. डिसेंबरअखेर सर्व तयारी पूर्ण होणार आहे.
लस पोहोचविण्यासाठी १०० शासकीय वाहने
जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय ६० वाहने आहेत. तसेच प्रशासनाच्या सूचनेनुसार आणखी ४० वाहने तैनात होऊ शकतात. यातून १०० वाहनातून या लसींचा पुरवठा होऊ शकतो. ७७ चेन पाॅइंटसवर पोहोचून या लसींचा साठा करून ठेवला जाईल. पुढे तेथून पुढच्या पाॅइंटपर्यंत लसींचा पुरवठा होणार आहे.
राज्य शासन, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार सुविधा निर्माण केल्या जात आहेत. जिल्हास्तरावर मोठा स्टोरेज केला जाईल. ज्यांचे लसीकरण होणार आहे. त्यांचा डाटा तयार केला गेला आहे. डिसेंबरअखेरपर्यंत सर्व तयारी करून लसीकरणासाठी सज्ज राहणार आहे. कामकाज वेगात सुरू आहे.
- डाॅ. एन.डी. बोडके,
जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार.