२३ पासून उपाययोजनांसह शाळा सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 12:14 IST2020-11-21T12:14:44+5:302020-11-21T12:14:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करुन जिल्ह्यातील नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग ...

२३ पासून उपाययोजनांसह शाळा सुरू करा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करुन जिल्ह्यातील नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग तसेच वसतीगृह, आश्रमशाळा तसेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह २३ नोव्हेंबर पासून सुरू करण्यास अनुमती देण्यात आली असून कोविड १९ च्या अनुषंगाने सूचनांचे पालन शाळा व्यवस्थापनाने करावे असे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड यांनी दिले आहेत.
शाळा सुरू करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी यांनी परिपत्रक काढले आहे. यात शाळा सुरु करण्यापूर्वी व सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुविधा विषयक उपाय योजनांबाबतच्या शालेय व क्रिडा विभागाने दिलेल्या निर्देशाचे पालन करणे बंधनकारक राहील. शाळा व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांच्या पालकांसमवेत पुर्वनियोजन, खबरदारी संदर्भात बैठक जनजागृती करावी. विद्यार्थी उपस्थितीबाबत पालकांकडून लेखी संमती घेण्यात यावी. ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धत अवलंबाबाबत लेखी संमती घेवून यादी करण्यात यावी. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड-१९ चाचणी करावी. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी चाचणीचे प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनास सादर करावे असे आदेश करण्यात आले आहेत.
थर्मामीटर, ऑक्सीमीटर, थर्मल गन, जंतुनाशक, साबण, पाणी उपलब्ध करुन द्यावे. यासाठी लागणारा निधी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत यांच्याकडून घ्यावा. शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण व्यवस्था स्थानिक प्रशासनाने यांच्या मार्फत करावी. शाळेच्या दर्शनी भागावर शारिरीक अंतर, मास्कचा वापर, हात स्वच्छ धुणे इत्यादी संदर्भात मार्गदर्शक असणारे फलक प्रदर्शित करणे बंधनकारक असेल. शाळेतील वर्गखोली तसेच स्टाफ रूम मधील बैठक व्यवस्था शारिरीक अंतराच्या नियमांनुसार असावी. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रामणे नावानिशी बैठक व्यवस्था करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी डाॅ. भारूड यांनी केले आहेत. शाळांमध्ये या दृष्टीने कामकाज सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
गर्दी होईल असे कार्यक्रम टाळावेत- जिल्हाधिकारी
संसर्ग टाळण्यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना शक्यतो स्वत:च्या वाहनाने शाळेत सोडावे. शाळा वाहतूक करणा-या वाहनाचे दिवसातून किमान दोनवेळा निर्जंतुकीकरण करण्यात यावे. शाळेतील परिपाठ, स्नेह संम्मेलन, क्रीडा व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते असे कार्यक्रम आयोजनावर निर्बंध कायम राहणार असल्याचे आदेशही परिपत्रकातून देण्यात आले आहेत