ज्वारीची श्रीमंती वाढली, मागणीतही झाली वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST2021-07-14T04:35:47+5:302021-07-14T04:35:47+5:30

नंदुरबार : पारंपरिक हंगामी शेती करणारे जिल्ह्यातील शेतकरी धान्य पिकात प्रथम प्राधान्य ज्वारीला देतात. रब्बी आणि खरीप ...

As sorghum wealth increased, so did demand | ज्वारीची श्रीमंती वाढली, मागणीतही झाली वाढ

ज्वारीची श्रीमंती वाढली, मागणीतही झाली वाढ

नंदुरबार : पारंपरिक हंगामी शेती करणारे जिल्ह्यातील शेतकरी धान्य पिकात प्रथम प्राधान्य ज्वारीला देतात. रब्बी आणि खरीप अशा दोन्ही हंगामात पेरणी होणारी ज्वारी गेल्या काही वर्षात भाव खात असल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या सबळ होत असल्याचे चित्र आहे. यंदाच्या वर्षात ज्वारीला गहू पिकाच्या बरोबरीने दर मिळाल्याने कोरडवाहू शेतकरी समाधानी झाले आहेत.

ज्वारी म्हणजे गरिबांचे अन्न असा साधारण समज होता. सधन कुटुंबांतच गहू हा नियमित खाल्ला जाई. परंतु गेल्या काही वर्षात संकरीत धान्याचे वाण उपलब्ध झाल्याने धान्याची उत्पादनक्षमता वाढली आहे. यातून काळाच्या ओघात धकाधकीचे जीवनमान असल्याने श्रीमंत व गर्भ श्रीमंतांसोबतच सधन कुटुंबात आता आरोग्यवर्धिनी म्हणून ज्वारीची भाकरी खाण्यास पसंती दिली जात असल्याने दरांमध्ये वाढ हाेत आहे.

ज्वारीत मोठ्या प्रमाणात प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स यांचा समावेश असतो. पिष्टमय पदार्थ, शर्करा आणि खनिजद्रव्य आदी घटक भरपूर प्रमाणात ज्वारीत असतात.

वजनवाढीचा त्रास असलेल्यांनी आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश केल्यास त्यांचे वजन नियंत्रणात येते. शरीराला कमी अन्नात आवश्यक ऊर्जा देण्याचे काम ज्वारी करते.

बहुतांश आहारतज्ज्ञांकडून ज्वारीची भाकरी खाण्याचा सल्ला दिला जातो. ज्वारीची भाकरी पचायला हलकी असल्याने वृद्ध नागरिक ज्वारीची भाकरी पसंत करतात.

नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामात सरासरी ४० हजार हेक्टरपर्यंत ज्वारीचा पेरा होण्याची शक्यता असते. रब्बी हंगामातही ज्वारीचा पेरा केला जातो. या ज्वारीचे हेक्टरी उत्पादन हे १४ क्विंटलपर्यंत येत असल्याने घरचे वार्षिक धान्य होऊन बाजारात विक्रीसाठीही ज्वारी शेतकरी नेतात. धडगाव आणि अक्कलकुवा हे प्रमुख ज्वारी उत्पादक तालुके आहेत.

घरी आजही आवडीने ज्वारीची भाकरी खातो. अन्न म्हणून ज्वारीला अधिक प्राधान्य आहे. गव्हाच्या पाेळ्याही खातो. परंतु अन्नात ज्वारीही अधिक सवयीची झाली आहे.

-नवा ओजऱ्या वसावे

लहानपणापासून भाकरी खायची सवय लागली आहे. आजदेखील ती कायम आहे. पूर्वी काळी ज्वारी मिळत होती आता महाग झाली.

-रतन मोचडा पावरा.

ज्वारी हे आदिवासी बांधवांचे मानाचे पीक आहे. शेत तिथे ज्वारी पेरणी होते. सर्वांकडे पारंपरिक बियाणे आजही आहे.

-होमनाबाई हुरता वसावे

ज्येष्ठ महिला

सणासुदीला पोळी करण्याची पद्धत आहे. ज्वारी ही सकस आहारात मोडली जाते. मुले आजही ज्वारीची भाकरी आवडीने खातात.

-जोबीबाई लेहऱ्या पावरा

ज्येष्ठ महिला

Web Title: As sorghum wealth increased, so did demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.