तर मग दुष्काळी सर्वेक्षणाची तयारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:34 IST2021-08-13T04:34:51+5:302021-08-13T04:34:51+5:30

नंदुरबार : जिल्ह्यात आजअखेरीस ४८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. या पावसाच्या बळावर शेतीक्षेत्रात ९३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या ...

So preparing for the drought survey ... | तर मग दुष्काळी सर्वेक्षणाची तयारी...

तर मग दुष्काळी सर्वेक्षणाची तयारी...

नंदुरबार : जिल्ह्यात आजअखेरीस ४८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. या पावसाच्या बळावर शेतीक्षेत्रात ९३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जमिनीतील ओलाव्याच्या बळावर केलेल्या पेरण्यांना येत्या १५ दिवसात योग्य तो पाऊस न मिळाल्यास पिके हातून जाण्याची चिन्हे आहेत. यातून १६ ऑगस्टनंतरही पाऊस न आल्यास कृषी विभाग दुष्काळी चाचपणीसाठी सर्वेक्षण मोहीम राबवून शासनाला आढावा देणार आहे.

जिल्ह्यात यंदा पावसाने संथ सुरुवात केल्याने १२ ऑगस्टपर्यंत २८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्यानुसार १२ ऑगस्टपर्यंत सरासरी ५८३ मिलिमीटर पाऊस कोसळण्याची अपेक्षा असते. परंतु यंदा मात्र निम्मे पाऊसच झाला आहे. सरासरीपेक्षा ५२ टक्के पाऊस कमी झालेला असल्याने त्याचा थेट परिणाम हा शेतीक्षेत्रावर झाला आहे. परिणामी शेतशिवारात पेरणी करण्यात आलेली बहुतांश पिके ही जमिनीतील ओलाव्यावर तग धरून आहेत. या पिकांना सध्या ढगाळ वातावरण तारून नेत आहे. दरम्यान आगामी संपूर्ण आठवडाभरात पाऊस नसल्याची माहिती असली तरी २० ऑगस्टनंतर मात्र जिल्ह्यात पाऊस कोसळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाची सरासरी यंदा कमी झाली असल्याने शासकीय कामकाज सुरू झाले आहे. येत्या काळात पाऊस न कोसळल्यास मंडळनिहाय माहिती घेत दुष्काळी स्थितीची चाचपणी केली जाणार आहे.

३७ दिवस कोरडे

जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या काळात ३७ दिवस हे कोरडे अर्थात बिनापावसाचे आहेत.

जून - कोरडे दिवस १५

जुलै -कोरडे दिवस १४

ऑगस्ट महिन्यात आजअखेरीस केवळ चार दिवस पाऊस कोसळला असून आठ दिवस हे कोरडे असल्याचे समोर आले आहे.

३६ दिवस पावसाचे

२४ तासात २.५ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस होणे म्हणजे तो दिवस पावसाचा गणला जातो. २४ तासात २.५ मि..मी.पेक्षा कमी पाऊस होणे म्हणजे कोरडा दिवस असतो.

जुन महिन्यात १५, जुलै महिन्यात १७ तर १२ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात चार दिवस पावसाची नोंद करण्यात आली आहे. एकूण २­८३ मिलीमीटर हा पाऊस झाला आहे.

पीकवाढीच्या अवस्थेत म्हणून धोका अधिक : जिल्ह्यात यंदाही कापूस पिकाला पसंती आहे. १ लाख २६ हजार हेक्टर कापूस लागवड पूर्ण झाली आहे. यातील ९० टक्के कापूस हा ३० दिवसांचा आहे. आगामी काळात पाऊस न झाल्यास या कापसाची अवस्था बिकट होऊन शेतकरी पिकाला मुकण्याची शक्यता अधिक आहे.

कडधान्य पिके कमीच

जिल्ह्यात यंदा ३७ हजार ८३४ हेक्टरवर यंदा कडधान्य पिके अपेक्षित होती. परंतु पावसाअभावी केवळ २० हजार ८९९ हेक्टर कडधान्य पिके पेरा झाला आहे. यात बरेच उत्पादन हे खराब झाल्याची माहिती आहे.

जिल्ह्यात यंदा २ लाख ८३ हजार ४८० हेक्टर क्षेत्रात खरीप पिके निर्धारित करण्यात आली होती. त्यातुलनेत आजअखेरीस २ लाख ५९ हजार ६७४ हेक्टर क्षेत्रात पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. एकूण ९१. ६ टक्के ह्या पेरण्या झाल्या आहेत.

तालुकानिहाय पेरणीचा आढावा घेतला असता, नंदुरबार तालुक्यात ६६ हजार ८४०, नवापूर ५३ हजार ८१२, शहादा ७१ हजार ०९, तळोदा ११ हजार ३८३, धडगाव १९ हजार २२९ तर अक्कलकुवा तालुक्यात ३७ हजार ३९८ हेक्टर पेरणी पूर्ण करण्यात आली आहे. यात तळोदा तालुका वगळता इतर पाच तालुक्यात पेरण्या पूर्ण क्षमतेने झाल्या आहेत. शहादा तालुक्यात १०० टक्के पेरण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.

पाऊस कमी झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पिकांना गरजेनुसार संरक्षित पाणी देण्याची व्यवस्था करावी तसेच जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी आंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. येत्या २० ऑगस्टनंतर जिल्ह्यात पाऊस येण्याची शक्यता आहे.

-सचिन फड, हवामान विशेषज्ञ, जिल्हा हवामान केंद्र, कोळदे, ता. नंदुरबार.

Web Title: So preparing for the drought survey ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.