पट्टेदार वाघाने उडवली दोन तालुक्यातील गावांची झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 12:24 IST2019-12-23T12:24:47+5:302019-12-23T12:24:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर तालुक्यातील गुजरात सिमेवर पट्टेदार वाघाचा संचार सुरु असल्याच्या वृत्ताने नवापुरसह नंदुरबार तालुक्यातील नागरिकांचीही ...

Sleeps of villages in two talukas by a striped tiger | पट्टेदार वाघाने उडवली दोन तालुक्यातील गावांची झोप

पट्टेदार वाघाने उडवली दोन तालुक्यातील गावांची झोप

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापुर तालुक्यातील गुजरात सिमेवर पट्टेदार वाघाचा संचार सुरु असल्याच्या वृत्ताने नवापुरसह नंदुरबार तालुक्यातील नागरिकांचीही झोप उडाली असून दर दिवशी ‘वाघ’ आला अशी आरोळी उठल्यावर गावांमध्ये धावपळ उडत आहे़ दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या अफवांमुळे वनविभागाची चांगलीच पंचाईत झाली असून कर्मचारी रात्री अपरात्री वनक्षेत्राऐवजी गावांमध्ये गस्त घालत आहेत़
कोकणीपाडा ता़ नंदुरबार येथे जुलै २०१८ मध्ये पट्टेदार वाघ दिसून आला होता़ गुजरात राज्याच्या डांग जिल्ह्यातील पूर्णा अभयारण्यातून वाट चुकलेला हा वाघ पुन्हा अभयारण्यात परत गेल्याचे कोणतेही पुरावे नसल्याने तो याच भागात असल्याचा दावा सातत्याने होत आहे़ यातच गेल्या १० दिवसांपासून नवापुर तालुक्यात वाघ दिसत असल्याच्या अफवांना ऊत आला आहे़ यामुळे जनजीवनासह शेती व इतर व्यवसायांवर परिणाम झाला आहे़ परंतू दिसून येणारा प्राणी हा बिबट्या असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे़ नवापुर, चिंचपाडा आणि खांडबारा वनक्षेत्रात बिबट्याचा संचार असून या भागात बिबट्यांची संख्या आठच्या पुढे असल्याचे सांगण्यात आले आहे़ दरम्यान नंदुरबार तालुक्यात ठाणेपाडा आणि भादवड वनक्षेत्रात वाघाच्या संचाराची माहिती वनविभागाला देण्यात आली होती़ वनविभागाने शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस गस्त केल्यानंतर त्याठिकाणी बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले होते़

नंदुरबार, नवापुर आणि शहादा या तीन तालुक्यात एकूण १ लाख ६१ हजार हेक्टर वनक्षेत्र आहे़ यातील चिंचपाडा आणि नवापुर हा परिसर २३ हजार तर खांडबारा वनक्षेत्र ९ हजार ३०० हेक्टर क्षेत्रात विस्तारले आहे़ गुजरात हद्दीला लागून असलेल्या या वनक्षेत्रात बिबट्यांची अधिक आहे़ यात पट्टेदार वाघ दिसत असल्याची माहिती वेळोवेळी देण्यात आली होती़ दोन महिन्यापासून नवापुर व चिंचपाडा या क्षेत्रात वाघाचा संचार सुरु असल्याचे सांगण्यात आले होते़ वनकर्मचाऱ्यांच्या पथकाने याठिकाणी भेटी देत पावलांचे ठसे घेण्यात आल्यानंतर ते बिबट्याचे असल्याचे सांगण्यात आले आहे़
४कोकणीपाड्यातून मार्गस्थ झालेल्या वाघाच्या गळ्यात कॉलर नसल्याने तो ‘पूर्णा अभयारण्य’ किंवा इतर ठिकाणाहून आला याची माहिती मिळाली नव्हती़ हा वाघ परत न जाता चिंचपाडा वनक्षेत्रातच स्थिरावल्याचे जाणकारांचे म्हणणे असून वनविभागानेही त्याला दुजोरा दिला होता़ परंतू वाघ एवढा मोठा काळ एकटा राहू शकत नसल्याचे कारण वनविभागाने दिले आहे़ यामुळे वाघासोबत वाघीण असावी असा अंदाज आहे़

नंदुरबार तालुक्यातील भादवड शिवारात शुक्रवारी रात्री बिबट्या दिसून आल्यानंतर नागरिकांची धावपळ उडाली होती़ हा प्राणी वाघच असल्याचे ग्रामस्थ ठामपणे सांगत होते़ परंतू पावलांच्या ठश्यांवरुन तो बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले़ नंदुरबार-खांडबारा रस्त्यालगतही वाघ दिसल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले होते़
 

Web Title: Sleeps of villages in two talukas by a striped tiger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.