विसरवाडीत दरोड्याचा प्रयत्न, चार दरोडेखोरांना अटक, एक फरार
By मनोज शेलार | Updated: October 20, 2023 14:03 IST2023-10-20T14:03:25+5:302023-10-20T14:03:42+5:30
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

विसरवाडीत दरोड्याचा प्रयत्न, चार दरोडेखोरांना अटक, एक फरार
नंदुरबार : युवतीच्या सतर्कतेमुळे विसरवाडी, ता.नवापूर येथे दरोड्याचा प्रयत्न फसला. नागरिकांच्या सहाय्याने पोलिसांनी चार दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या असून एका फरार दरोडेखोराचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिस सूत्रांनुसार, विसरवाडी येथील मध्यवस्थीत राहणारे व्यापारी भरत अग्रवाल यांच्या घरात शुक्रवारी पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास पाच दरोडेखोरांनी प्रवेश केला. गच्चीचा दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी अग्रवाल दाम्पत्याच्या बेडरूममध्ये घुसून त्यांना दोराने बांधून ठेवले. घरातील रोख रक्कम, दागीने व इतर किंमती वस्तू त्यांनी दोन बॅगांमध्ये भरल्या. आणखी दागीने कुठे आहे म्हणून अग्रवाल दाम्पत्याला त्यांनी मारहाण केली. याचवेळी बाजुच्या बेडरूममध्ये झोपलेल्या मुलीला जाग आली.
तिने घाबरून न जाता गुपचूप बाजुचा दरवाजा उघडून लगच्या घरात राहणारे नातेवाईकांना फोन करून उठवले. लागलीच विसरवाडी पोलिसांना कळविण्यात आले. परिसरातील नागरिक व पोलिसांनी घराला घेराव घालून चार दरोडेखोरांना ताब्यात घेतले. त्यातील एक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. दरोडेखोर स्थानिक असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. त्यांच्या साथीदाराचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.