वाढदिवसानिमित्त देहदानाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:21 IST2021-01-13T05:21:38+5:302021-01-13T05:21:38+5:30
‘मरावे परि कीर्तीरुपी उरावे’ अशी मराठीत एक म्हण आहे. जिवंतपणी माणूस समाजाच्या कामी येत असतोच; पण मृत्यूनंतरही तो उपयोगी ...

वाढदिवसानिमित्त देहदानाचा संकल्प
‘मरावे परि कीर्तीरुपी उरावे’ अशी मराठीत एक म्हण आहे. जिवंतपणी माणूस समाजाच्या कामी येत असतोच; पण मृत्यूनंतरही तो उपयोगी पडू शकतो, हे आधुनिक विज्ञानाने सिद्ध केले आहे. योग्य प्रमाणात अवयवदान होत नसल्याने आजही कित्येक जण हे विविध अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. मृतदेह जाळून नदी किंवा तलावात रक्षा विसर्जन करण्यात येते. यामुळे जलप्रदूषण होते. ते टाळण्यासाठी देहदान उत्तम पर्याय आहे. मरणोत्तर अवयवदानामुळे अन्य कोणीतरी हे सुंदर जग पाहू शकेल. अशा भावनेतून ७३ व्या वाढदिवसानिमित्त प्रभावती वामनराव जाधव यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला. प्रभावती जाधव ह्या खान्देश कन्या असून, त्यांचे माहेर धुळे येथील असून नंदुरबार गाडीलोहार समाजाचे अध्यक्ष मणिलाल सोमवंशी यांच्या त्या विहीण तर शहादा येथील मीना सुनील सोमवंशी यांच्या आत्या आहेत. जाधव यांची देवावर पूर्ण श्रध्दा असूनही विज्ञानवरही त्यांचा विश्वास आहे. मृत्यूनंतर आपला देह कोणाच्या तरी कामी यावा या भावनेतून देहदान करण्याची इच्छा त्यांनी निराली व पायल या आपल्या नातींजवळ व्यक्त केली. मुलींनी आपल्या आई-वडिलांजवळ आजीचा संकल्प सांगितला. त्यांच्या एकुलत्या एक मुलाने व सुनेनेही त्यांच्या इच्छेचा मान राखत त्यांना देहदान करण्यास संमती दिली. ९ जानेवारी रोजी आपल्या ७३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभावती जाधव यांनी देहदान करण्याच्या संकल्पपत्राची पूर्तता करून संपूर्ण समाजासमोर आदर्श उभा केला. त्यांच्या या निर्णयाचे आणि त्यांना देहदानासाठी संमती देणारे त्यांचे पुत्र हरीश, सून नयना, नाती निराली व पायल आणि नातजावई मयूर यांचे समाजातर्फे कौतुक करण्यात येत आहे. खान्देश व सुरत येथील गाडीलोहार समाजात देहदानाचा संकल्प करणाऱ्या प्रभावती जाधव ह्या पहिल्याच आहेत.