विहिरीत पडलेल्या सापांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 12:50 IST2020-10-09T12:50:13+5:302020-10-09T12:50:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथील शेतकरी रविकिरण शिंदे यांच्या शेतातील विहिरीत गेल्या दोन ते तीन ...

विहिरीत पडलेल्या सापांना जीवदान
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथील शेतकरी रविकिरण शिंदे यांच्या शेतातील विहिरीत गेल्या दोन ते तीन महिन्यापासून विहिरीत पडलेल्या दोन सापांना मोड येथील सर्पमित्र अविनाश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी पकडून जंगलात सोडून देण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत असे की, तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथील रविकिरण शिंदे यांच्या शेतातील विहिरीत जवळपास तीन महिन्यापासून दोन साप पडले होते. विहीर कामात येत नसल्याने सुरुवातीला त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते. पण या विहिरीत जास्त काळ साप जीवंत राहू शकत नसल्याची व सापांपासून असणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन रविकिरण यांनी त्या सापांना बाहेर काढण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य अविनाश पाटील यांना सापांबद्दल माहिती दिली व त्यांना वाचविण्यासाठी विहिरीतून बाहेर काढण्यासाठी चर्चा केली. अविनाश पाटील व प्रमोद पाटील यांनी घटनास्थळी भेट देत विहिरीची पाहणी केली. विहिरीला जवळपास ५० फुटापासून पाणी होते. त्यामुळे त्यांना विहिरीत उतरणे सुरक्षित नसल्याचे लक्षात आले. दोराला एक झुडूप बांधून विहिरीत टाकले आणि सापाला त्या झुडपामध्ये अडकून सुरक्षित वर काढले. सापांना वर काढल्यावर दोन्ही साप हे अत्यंत विषारी नाग जातीचे असल्याचे स्पष्ट झाले. या दोन्ही विषारी सापांना जीवावर खेळून सर्पमित्रांनी त्यांना सुरक्षित त्यांच्या अधिवासात सोडले. या कामगिरीसाठी सर्पमित्रांना रविकिरण शिंदे, रवी गोसावी, गोपाळ कोळी, वसंत गोसावी व राहुल निकुंभ या युवकांनी त्यांना मदत केली. सर्पमित्रांच्या या कामाचे पंचक्रोशीत कौतुक करण्यात येत आहे.