किलीमांजरोनंतर एव्हरेस्टचे शिखर गाठायचे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 12:01 IST2021-01-12T12:01:01+5:302021-01-12T12:01:09+5:30
रमाकांत पाटील लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील अनिल वसावे हा युवक येत्या २६ जानेवारीला दक्षिण अफ्रिकेतील ...

किलीमांजरोनंतर एव्हरेस्टचे शिखर गाठायचे...
रमाकांत पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील अनिल वसावे हा युवक येत्या २६ जानेवारीला दक्षिण अफ्रिकेतील किलीमांजरो या शिखरावर भारताचा तिरंगा फडकावणार आहे. हे शिखर गाठण्यासाठी जाणाऱ्या भारतातील १० गिर्यारोहक पथकात त्याची निवड झाली आहे. दक्षिण अफ्रिकेतील अतिशय अवघड व आव्हानात्मक असलेले हे शिखर सर केल्यानंतर एव्हरेस्टचे शिखर गाठण्याचे त्याचे स्वप्न असून त्यासाठी तो प्रयत्न करीत आहे.
अनिल वसावे हा अतिदुर्गम भागातील बालाघाट, ता.अक्कलकुवा येथील रहिवासी. त्याच्या गावापर्यंत वाहन जात नाही. बालाघाटहून एक किलोमीटर पायी चालल्यानंतर तो राहत असलेल्या देवबारीपाडा ही वस्ती येते. या वस्तीजवळच सातपुड्याचा मोठा डोंगर आहे. या डोंगरावर चढ-उताराच्या सवयीतून त्याला गिर्यारोहणाचे वेड लागले. आणि त्यातूनच त्याने आतापर्यंत महाराष्ट्रातील कळसूबाई, अजिंक्यतारा, गटेश्वर, हरिश्चंद्र गड आणि सातपुड्यातील अस्तंबा तसेच चेन्नई येथील शिखर सर केले आहे. त्याची गुणवत्ता हेरुन आंतरराष्ट्रीय कोच आनंद बनसोडे यांनी त्याची किलीमांजरोसाठी निवड केली आहे.
दक्षिण अफ्रिकेतील किलीमांजरोचे शिखर सर करण्याची सुरुवात २२ जानेवारीला भारतीय पथक मोशीपासून करणार आहे. २६ जानेवारीला शिखर गाठतील.
सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात गावाजवळीलच डोंगरावर चढ-उताराचा सराव करून थेट आंतरराष्ट्रीय गिर्यारोहकाचा मान पटकावणारा बालाघाट, ता.अक्कलकुवा येथील अनिल वसावे या युवकाची यशकथा म्हणजे सातपुड्यातील प्रत्येक आदिवासी तरुणासाठी प्रेरणा देणारी ठरली आहे. प्रतिकूल परिस्थितीत त्याने मिळविलेले यश थक्क करणारे आहे.
अनिल वसावेचे शिक्षण बालाघाटमधीलच वस्तीशाळेत झाले. या वस्तीशाळेतच त्याने प्राथमिक शिक्षणाचे धडे घेतले. त्यानंतर बारावीपर्यंत आश्रमशाळेत शिक्षण घेतले. पुढे सातारा येथे डी.फार्मसी करुन मुक्त विद्यापीठातून त्याने बी.ए.ची पदवी घेतली आहे. सध्या तो स्पर्धा परीक्षेचा सराव करीत आहे.
किलीमांजरोचे शिखर गाठल्यानंतर आपण लागलीच एव्हरेस्ट सर करण्याची तयारी करणार आहोत. एव्हरेस्ट गाठणे हे आपले स्वप्न असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. एकदा हे शिखर गाठल्यानंतर सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यातील तरुणाईत खूप टॅलेन्ट दडले आहे. हे टॅलेन्ट शोधून त्याला आकार देण्यासाठी आणि व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सातपुड्यात अकादमीची स्थापना करण्याचा मानस आहे. त्यासाठी जे जे शक्य ते करू.
-अनिल वसावे, गिर्यारोहक. बालाघाट, ता.अक्कलकुवा.