सिटी स्कॅनपूर्वी रॅपिड अँटिजेन चाचणी आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:28 IST2021-04-13T04:28:45+5:302021-04-13T04:28:45+5:30

नंदुरबार : जिल्ह्यातील सर्व सिटी स्कॅन केंद्रांवर सिटी स्कॅन करण्यापूर्वी रॅपिड अँटिजेन चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या ...

Rapid antigen testing required before CT scan | सिटी स्कॅनपूर्वी रॅपिड अँटिजेन चाचणी आवश्यक

सिटी स्कॅनपूर्वी रॅपिड अँटिजेन चाचणी आवश्यक

नंदुरबार : जिल्ह्यातील सर्व सिटी स्कॅन केंद्रांवर सिटी स्कॅन करण्यापूर्वी रॅपिड अँटिजेन चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या चाचणीत कोरोनाचा संसर्ग आढळल्यास संबंधित व्यक्तीला कोविड केअर सेंटर अथवा कोविड रुग्णालयाशी संपर्क साधून उपचार घेण्याचा सल्ला देण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.

जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्ह्यातील सर्व सिटी स्कॅन केंद्रांची माहिती संकलित करतील तसेच सर्व सिटी स्कॅन केंद्रांवर रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यासाठी पथकाची नियुक्ती करतील. हे पथक सिटी स्कॅनसाठी येणाऱ्या व्यक्तीची रॅपिड अँटिजेन चाचणी करून घेतील व त्याबाबतच्या नोंदी ठेवतील. या चाचणीत पॉझिटिव्ह आढळणाऱ्या व्यक्तीचे सिटी स्कॅन होणार नाही, निगेटिव्ह आलेल्या व्यक्तीची ऑक्सिजन पातळी मोजून सिटी स्कॅनसाठी सल्ला देण्यात येईल. सिटी स्कॅन केंद्राबाहेर शासन मान्यतेचे दरपत्रक लावणे व त्यानुसार दराची आकारणी करणे बंधनकारक राहील.

कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Rapid antigen testing required before CT scan