दिल्ली आंदोलनाचे कारण पुढे करीत केळी आणि पपईचे भाव घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 13:11 IST2020-12-16T13:11:24+5:302020-12-16T13:11:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : दिल्लीमध्ये गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे व्यापाऱ्यांनीही त्याचे निम्मित पुढे केल्याने तळोदा ...

दिल्ली आंदोलनाचे कारण पुढे करीत केळी आणि पपईचे भाव घसरले
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : दिल्लीमध्ये गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे व्यापाऱ्यांनीही त्याचे निम्मित पुढे केल्याने तळोदा तालुक्यातील केळी व पपई उत्पादक शेतकऱ्यांनादेखील त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे भाव सातत्याने खाली येत आहेत. केंद्रशासनाने सदर आंदोलनावर ठोस कार्यवाही करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी विधेयकावरून गेल्या २० दिवसांपासून दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाबाबत शेतकरी व शासन हे दोन्ही वर्ग मागे हटायला तयार नाही. त्यामुळे आंदोलनही तीव्र होत आहे. तथापि, या आंदोलनामुळे तळोदा तालुक्यातील केळी व पपई उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. कारण आंदोलनामुळे माल वाहतुकीसही अडथळा येत असल्याने नुकसानी पोटी व्यापारी माल घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे शेतकरी सांगतात. ते मनमानी पद्धतीने मालाची मागणी करतात. यापूर्वी एक हजार २०० रुपये असलेला भाव ५०० ते ७०० रुपयांवर आला आहे. पपई तर पाच रुपये दराने खरेदी करीत आहेत. मालाची अशा घसरणीमुळे शेतकरी अक्षरशः वैतागला आहे.
आधीच कोरोनामुळे केळी कवडीमोल भावात विकावी लागली होती. त्यानंतर दरात समाधानकारक वाढ झाली असताना त्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाने खोडा घातला आहे. आधीच सततच्या पर्जन्यवृष्टीने सर्वच पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट आली होती. त्याच्या फटक्यातून अजूनही शेतकरी सावरलेला नाही. त्यात तो कर्जबाजारी झाला आहे. अगदी उत्पादनावर केलेला रासायनिक खते व बियाण्यांचा खर्चसुद्धा निघालेला नाही. तरीही केळी, पपईवर त्यांच्या आशा उरल्या होत्या. परंतु आंदोलनाने त्यांच्या आशेवर पूर्णतः पाणी फेरले आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांचा केळी, पपईच्या माल मुख्यतः दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल या राज्यात व्यापारी विक्रीस नेत असतात. नेमके तेथेच आंदोलन चिघळले असल्याने गाड्यांच्या चक्का जाम असल्याचे व्यापारी सांगतात. केंद्र शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या आंदोलनावर ठोस तोडगा काढून तो मिटवावा, अशी मागणी आहे.
टरबूजवरही संक्रांत
टरबूज पिकावरदेखील दर घसरणीची संक्रांत आली आहे. कारण चागल्या दर्जाच्या टरबूजला तीन रूपये दर दिला जात आहे तर कमी प्रतिचे टरबूज कोणी व्यापारी घ्यायला येत नाही, त्यामुळे असे टरबूज फुकटात देत असल्याची व्यथा शेतकरींनी बोलून दाखवली आहे. वास्तविक एकेरी ६० ते७० हजार रुपये खर्च करून तोही मिळत नसल्याने त्याच्या तोंडचे पाणीच पळाले आहे.
नुकत्याच झालेल्या बेमोसमी पावसामुळे टरबूज उत्पादक शेतकऱ्यांचे असे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय हरभरा पिकाबाबतही असेच चित्र असल्याचे म्हटले जात आहे.