पपई दराचा तिढा सुटला ७ रुपये ११ पैसे दर निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 12:13 PM2020-11-22T12:13:53+5:302020-11-22T12:14:01+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात प्रांताधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे यांच्या सूचनेनुसार पपई दराचा तिढा ...

The price of papaya has dropped sharply to Rs 7 11 paise | पपई दराचा तिढा सुटला ७ रुपये ११ पैसे दर निश्चित

पपई दराचा तिढा सुटला ७ रुपये ११ पैसे दर निश्चित

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा :  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात प्रांताधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे यांच्या सूचनेनुसार पपई दराचा तिढा सोडवण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी, पपई उत्पादक शेतकरी समन्वय समिती व शेतकरी यांच्यात तब्बल चार तास प्रदीर्घ चर्चा होऊन अखेर सात रुपये ११ पैसे पपईचा दर ठरविण्यात आला.
उत्तर भारतात पपईचे दर चांगले असूनही येथील पपई खरेदीदार व्यापारी कमी दरात शेतकऱ्यांकडून पपई खरेदी करीत होते. त्यासाठी पपई उत्पादक संघर्ष समितीने प्रशासनाने मध्यस्थी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शुक्रवारी तहसील कार्यालयात प्रांताधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी व पपई उत्पादक समन्वय समिती, व्यापारी, शेतकरी यांच्यात प्रदीर्घ चर्चा होऊनही तोडगा निघू शकला नाही. अखेर प्रांताधिकाऱ्यांनी समन्वयाने तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये शनिवारी चर्चा झाली. त्यात तीन दिवसात उत्तर भारतातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लॉकडाऊन झाल्यास  शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचेही नुकसान होईल या हेतूने तातडीने बाजार समितीच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. सुमारे चार तास दरासंदर्भात प्रदीर्घ चर्चा झाली. व्यापारी आणि शेतकऱ्यांनी समन्वयातून सात रुपये ११ पैसे दर निश्चित केला. पुढील बैठक होईपर्यंत या दराने पपईची तोडणी करावी, असे आवाहन करण्यात आले. बैठकीला कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुनील पाटील, पपई उत्पादक समन्वय समितीचे भगवान पाटील,  विश्वनाथ पाटील, दीपक पाटील, डॉ. उमेश पाटील, प्रफुल पाटील, राकेश गिरासे, दिनेश पाटील, संदीप माळी आदींसह शेतकरी उपस्थित होते. तर व्यापारी प्रतिनिधी म्हणून नाजिम बागवान, फारुक बागवान, हाशिम मुल्लाजी, इक्बाल बागवान ,शहबाज पठाण, प्रकाशराजस्थानी, जोगाराम राजस्थानी, छोटेराम राजस्थानी आदींसह व्यापारी उपस्थित होते.

Web Title: The price of papaya has dropped sharply to Rs 7 11 paise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.