नंदुरबार तालुक्यात सेंद्रिय गटशेतीला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:33 IST2021-01-19T04:33:09+5:302021-01-19T04:33:09+5:30

शासनाच्या परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कडून जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, नवापूर, धडगाव तालुक्यात ...

Preference for organic group farming in Nandurbar taluka | नंदुरबार तालुक्यात सेंद्रिय गटशेतीला प्राधान्य

नंदुरबार तालुक्यात सेंद्रिय गटशेतीला प्राधान्य

शासनाच्या परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कडून जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, नवापूर, धडगाव तालुक्यात प्रकल्प राबविण्यात येत आहेत. नंदुरबार तालुक्यात या योजनेंतर्गत गटाची रचना करण्यात आली असल्याने एका गटाला ५० एकर सामूहिक शेतजमीन व गटात २० ते ५० शेतकऱ्यांचा समूह तयार करण्यात येतो. या शेतकऱ्यांसाठी ही योजना तीन वर्षे कार्यरत असते. या योजनेचे नंदुरबार तालुक्यात पाच गटांची निर्मिती करण्यात आली आहे. श्री स्वामी समर्थ सेंद्रिय शेतकरी गट नंदुरबार, संत दगा महाराज सेंद्रिय शेतकरी गट चौपाळे, कृषक मंडळ सेंद्रिय शेतकरी गट धानोरा-मालपूूर, प्रगती सेंद्रिय शेतकरी गट कोठडे, एकलव्य सेंद्रिय शेतकरी गट आर्डीतारा या गटांची निर्मिती करण्यात आली आहे.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेकडून शेतकरी गटांची निर्मिती केली. गटातील शेतकऱ्यांकडून माती परीक्षण करण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. सेंद्रिय शेतीत यशस्वी शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा काढून विविध यशस्वी शेतकऱ्यांविषयी माहिती दिली जाते. गटातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीमध्ये सेंद्रिय खत व सेंद्रिय औषधीनिर्मिती करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. सेंद्रिय शेती योजनेत सहभागी शेतकऱ्यांना सहभागी हमी पद्धतीने प्रमाणीकरण करण्यात आले. मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडून सेंद्रिय शेतीमालाची तपासणी करण्यात येत आहे.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कडून शेतीमालाचे पॅकेजिंग, लेवलिंग, आणि ब्रँडिंग करण्यासाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जाते. सेंद्रिय उत्पादित माल विक्रीसाठी मेळावे भरवण्यात येतात. आठवडे बाजार, मॅाल, प्रदशने आदी ठिकाणी शेतमाल विकण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना सरळ ग्राहकाला माल विकता येतो. त्यामुळे दोघांनाही फायदा होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

पिकांना फवारणी करण्यासाठी रासायनिक औषधांना जास्त प्रमाणात खर्च येत असल्याने सेंद्रिय पारंपरिक पद्धतीने सेंद्रिय निविष्ठा अल्प खर्चात तयार होत असल्याने शेतकऱ्यांना कमी भांडवलामध्ये शेती करणे परवडत आहे. त्यामुळे सेंद्रिय पारंपरिक पद्धतीने सेंद्रिय निविष्ठा करण्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दिले जाते. शेतकऱ्यांना जीवामृत, बीजामृत, बायोडायनामिक कम्पोस्ट डेपो, गांडूळ खत डेेपो, दशपर्णी अर्क, नॅडेप डेपो, निंबोळी अर्क, गांडूळ खत युनिट उभारणी, वेस्ट डिकम्पोजर औषध आदी तयार करण्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांकडून करवून घेतले जाते.

सेंद्रिय गटांना मार्गदर्शन करण्यासाठी सर्ग विकास समिती व बायोसर्ट इंदौर येथील संस्थेचे तज्ज्ञ मार्गदर्शन करण्यासाठी गट बैठका आयोजित केल्या जातात. शासनाकडून गटांना वारंवार मार्गदर्शन व नियोजन करण्यासाठी आत्मा योजनेचे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक चंद्रकांत बागूल, तालुका कृषी अधिकारी आर.एम. पवार, प्रकल्प उपसंचालक एन.बी. भागेश्वर, प्रकल्प संचालक अनंत पोटे यांच्यातर्फे सर्व सेंद्रिय शेती गटावर नियंत्रण ठेवले जात आहे.

Web Title: Preference for organic group farming in Nandurbar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.