निवडणूक निकालानंतर महाआघाडी पॅटर्नची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 12:30 IST2021-01-11T12:30:36+5:302021-01-11T12:30:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ग्रामीण विकासात महत्त्वाचे स्थान असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचा प्रचार ऐन भरात आहे. राज्यात महाविकास आघाडीप्रमाणे ...

निवडणूक निकालानंतर महाआघाडी पॅटर्नची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ग्रामीण विकासात महत्त्वाचे स्थान असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचा प्रचार ऐन भरात आहे. राज्यात महाविकास आघाडीप्रमाणे तीन राजकीय पक्षांचे पदाधिकारी एकत्र येवून निवडणूका लढवतील अशी अपेक्षा होती. परंतू ग्रामपंचायत निवडणूकीत गाव पातळीवरील नेत्यांचे अस्तित्त्व महत्त्वाचे असल्याने पक्षीय पातळीवरुन त्यांच्यावर कोणतीही बंधने नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.
यातून ग्रामपंचायत निवडणूकीत महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे पदाधिकारी असलेले नेते व कार्यकर्ते पॅनलच्या माध्यमातून स्वतंत्रपणे लढत आहेत. विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा कार्यक्रम सुरु असताना पक्षाचा आदेश मानत निष्ठेने काम करणारे पुढारी व कार्यकर्ते निवडणूक प्रचारात पक्षाच्या चिन्हाचा किंवा पदाचा वापर न करता गावातील मुद्द्यांवर चर्चा करत असल्याने या निवडणूका राजकीय पक्षविरहित ठरत आहेत. असे असले तरी येत्या काळात ग्रामपंचायतीत बहुमत सिद्ध करुन सरपंच पद मिळवण्यासाठी राज्यात सत्तेत असलेले किंवा विरोधात असलेल्या हातमिळवणी करण्याची वेळ आल्यास तसेही शक्य करुन दाखवण्याचा निश्चय पुढारी व कार्यकर्त्यांचा आहे. सध्या सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये पदाधिकारी ज्या पक्षाचा असेल त्याच्या पॅनललाही त्याच पक्षाचा म्हणून ओळख मिळत आहे. केवळ एवढ्याचा एका बाबीतून ही निवडणूक राजकीय पक्षांसोबत निगडीत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे नंदुरबार तालुक्यात बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींवर मात्र महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांचाच बाेलबाला आहे. तीन ठिकाणच्या बिनविरोध ग्रामपंचायतीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील तोडगा काढून सरपंचपदावर हक्क सांगितला आहे.
निवडणूकीत एकमेकांचे उणेदुणे काढणे टाळण्यावरच अधिक भर
दरम्यान सध्या निवडणूक प्रचार सुरु असताना गावात गेल्या पाच वर्षातील विकास आणि येत्या पाच वर्षातील विकास यावरच बोलण्याची तसदी उमेदवार घेत आहेत.
केवळ गावातील मुद्दयांवर चर्चा होत असल्याने येत्या काळात ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी मदत लागल्यास वाद हाेवू नये, म्हणून वादाचे मुद्दे टाळले जात असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
दरम्यान याबाबत काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष दिलीप नाईक यांना संपर्क केला असता, प्रकृती बरी नसल्याने आरामक करत असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान ग्रामपंचायत निवडणूकांचा येत्या आठवड्यात आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. आघाडीची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली. दुसरीकडे काँग्रेसचे इतर पदाधिकारीही निकालानंतरच्या आघाडीसाठी अनुकूल असल्याचे सांगण्यात आले आहे.
निकालानंतर चित्र बदलेल
नंदुरबार जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम सुरु आहे. १५ रोजी मतदान झाल्यानंतर मतमोजणी होणार आहे. मतमोजणीनंतर निवडून येणा-या जागांनुसार सरपंच पदावर दावे-प्रतिदावे होणार आहेत. यात मित्रपक्षांची गरज भासण्याची शक्यता आहे. पॅनलला संपूर्ण बहुमत न मिळाल्यास निवडून आलेल्या दुस-या पॅनलच्या उमेदवाराला सोबत घेता यावे यासाठीही आतापासून फिल्डिंग लावली जात आहे.
गावपातळीवरील नेत्यांचा निर्णय हा महत्त्वाचा आहे. ते गावाचं राजकारण करत असल्याने त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये यापूर्वी झालेले वाद व भानगडींमुळे अनेकांचे संबध खराब झाले आहेत. यामुळे या निवडणूका पक्षविरहीत व्हाव्यात अशी अपेक्षा आहे. निकालानंतर बदल शक्य आहेत.
- डाॅ. विक्रांत मोरे
जिल्हाध्यक्ष, शिवसेना
ग्रामीण निवडणूका हा राजकारणा पाया आहे. तेथील स्थानिक नेत्यांची मते व विचारांना महत्त्व आहे.स्थानिक पातळीवर त्यांनी घेतलेल्या निर्णयांना पक्षीय पातळीवर स्थान आहे. यातून आघाडीसारखे निर्णय झालेले नाहीत. निकालानंतर मात्र चित्र बदलू शकते.
- डाॅ. अभिजीत मोरे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी