शहादा तालुक्यातील राजकीय वातावरण तापणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:31 IST2021-03-10T04:31:08+5:302021-03-10T04:31:08+5:30

जिल्हा परिषदेच्या ५६ जागांपैकी शहादा तालुक्यात सर्वाधिक १४ जागा आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ओबीसी संवर्गातील भारतीय जनता पक्ष व ...

The political atmosphere in Shahada taluka will heat up | शहादा तालुक्यातील राजकीय वातावरण तापणार

शहादा तालुक्यातील राजकीय वातावरण तापणार

जिल्हा परिषदेच्या ५६ जागांपैकी शहादा तालुक्यात सर्वाधिक १४ जागा आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ओबीसी संवर्गातील भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन अशा चार जागा रिक्त झाल्या आहेत. यात तालुक्यातील लोणखेडा गटातून भारतीय जनता पक्षातर्फे विजयी झालेल्या आरोग्य व शिक्षण सभापती जयश्री पाटील व पाडळदा गटातून विजयी झालेले धनराज पाटील यांच्यासह काँग्रेसतर्फे म्हसावद गटातून विजयी झालेले कृषी व पशुसंवर्धन सभापती अभिजित पाटील व कहाटूळ गटातून विजयी झालेल्या शालिनीबाई सनेर या चार सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे.

शहादा पंचायत समितीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सहकार्याने भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. सभापती व उपसभापतीपद भाजपच्या ताब्यात आहे. मात्र तालुक्यातील आठ पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. यात उपसभापती रवींद्र पाटील (जावदे त.बो.), विद्या विजय चौधरी (खेडदिगर), सुषमा शरद साळुंखे (मंदाणे), श्रीराम धनराज याईस (डोंगरगाव), कल्पना श्रीराम पाटील (मोहिदे त.ह.) या भारतीय जनता पक्षाच्या पाच सदस्यांचा समावेश असून काँग्रेसचे वैशाली किशोर पाटील (सुलतानपूर) व शिवाजी मोतीराम पाटील (शेल्टी) या दोन सदस्यांसह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एकमेव सदस्य योगेश मोहन पाटील (पाडळदे बुद्रुक) अशा एकूण आठ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले असल्याने पंचायत समितीतील राजकीय परिस्थिती कमालीची बदलली आहे.

पंचायत समितीचा विचार केला तर सर्वोच्च न्यायालयाचा सर्वाधिक मोठा फटका सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला बसला आहे. भारतीय जनता पक्षाचे पाच व त्यांना पाठिंबा देणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एक असे एकूण सहा सदस्य सत्ताधारी भाजपचे कमी झाले आहेत. येथील पंचायत समितीत एकूण २८ सदस्य संख्या असून पैकी भाजपचे १४,, काँग्रेसचे १३ व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एक अशी सदस्य संख्या आहे. १५ सदस्यांच्या बळावर भाजपची सत्ता पंचायत समितीवर आहे. मात्र या १५ सहा सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले असल्याने भाजपची सदस्य संख्या नऊ झाल्याने पक्षासमोर राजकीय संकट उद्‌भवले आहे तर काँग्रेसच्या १३ पैकी केवळ दोन सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले असून आता त्यांची संख्या ११ आहे.

Web Title: The political atmosphere in Shahada taluka will heat up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.