पाणी आणि चिखलात सडू लागली मिरची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 12:15 IST2020-12-14T12:15:11+5:302020-12-14T12:15:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तीन दिवसाच्या पावसामुळे जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले ...

पाणी आणि चिखलात सडू लागली मिरची
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तीन दिवसाच्या पावसामुळे जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेकडो एकर परिसरात पसरलेल्या मिरची पथारींवर पाणी व चिखल झाला आहे. त्यामुळे मिरची सडण्याची भिती आहे. यामुळे यंदा मिरची प्रक्रिया उद्योगावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. नुकसानीची दखल प्रशासनाने घ्यावी अशी मागणी होत आहे.
जिल्ह्यात गुरुवारपासून ढगाळ वातावरण व पाऊस सुरू आहे. रविवारी सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु तीन दिवसांपासूनच्या पावसामुळे मात्र शेती आणि व्यापारऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. शहरात सर्वत्र पाणी आणि चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. ठिकठिकाणी रस्त्यांची देखील वाट लागली आहे. नंदुरबारातील होळ शिवार आणि चौपाळे शिवारातील मिरची पथारींवर तर चिखल आणि पाणी साचले आहे. त्यामुळे पथारींवरील शेकडो क्विंटल मिरची खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
आधीच क्षेत्र कमी
यंदा आधीच मिरचीचे क्षेत्र कमी झाले आहे. शिवाय अतिवृष्टी आणि वारंवार वातावरणातील बदलामुळे मिरचीवर विविध पिपकांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे मिरची उत्पादन यंदा कमी होत आहे. त्यातच अवकाळी पावसाने फटका दिला आहे. यंदा मिरचीला चांगला भाव मिळण्याची आशा शेतकऱ्यांना होती. परंतु ती देखील फोल ठरली आहे. आता तर पावसामुळे मिरची डागी होण्याचे प्रमाण आणि त्यावर विविध रोगाचे प्रमाण देखील वाढणार असल्यामुळे पुन्हा भाव घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिरचीचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.
व्यापाऱ्यांचेही नुकसान
पावसामुळे मिरची खरेदीदार व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. पथारींवरील शेकडो क्विंटल मिरची सडण्याच्या मार्गावर आहे. शहरात होळ शिवारात अर्थात उड्डाणपुल परिसर आणि धुळे रस्त्यावरील चौपाळे शिवार परिसरात मिरची पथारी आहेत. शेकडो एकर क्षेत्रावर असलेल्या या पथारींवर मिरची स्वच्छ करणे, खुडणे आणि वाळविण्याचे काम केले जाते. सुकलेली मिरची भरून गोडावूनमध्ये नेणे अशी कामे या ठिकाणी केली जातात.
सततच्या पावसामुळे पथारींवर पाणी साचले आहे. काळी मातीच्या परिसर असल्यामुळे चिखलाचे देखील साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे मिरचीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
त्यामुळे झालेल्या नुकसानीची दखल घेऊन पंचनामे करावे व मदतीसाठी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागीण देखील व्यापारी वर्गाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे मिरची खरेदी अर्थात लिलाव होणार नसल्याचे बाजार समितीने आधीच कळविले आहे. त्यामुळे शेतकरऱ्यांनी मिरची विक्रीसाठी बाजार समितीत आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, अनेक शेतकरऱ्यांची मिरची शेतातच खराब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचा देखील पंचनामा करण्याची मागणी आहे.