आनंदटेंभा पाडय़ात ग्रामस्थांची ‘आनंद’ भरारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 13:00 IST2018-05-08T13:00:52+5:302018-05-08T13:00:52+5:30
अतिदुर्गम भागातील मनवाणी खुर्दची यशोगाथा : लखपती किसान स्मार्ट योजनेत आदिवासींना मिळाली विकासाची दिशा

आनंदटेंभा पाडय़ात ग्रामस्थांची ‘आनंद’ भरारी !
रमाकांत पाटील ।
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 8 : गेल्या तीन पिढय़ांपासून अज्ञान आणि दारिद्रय़ाच्या अंधारात दु:ख आणि वेदनेच्या पीडा सोसणा:या मनवाणी खुर्द येथील आनंदपाडय़ातील आदिवासी सध्या पाडय़ाच्या नावाप्रमाणे जगण्याचा नवा अनुभव घेत आहेत. टाटा ट्रस्टने या गावात ‘मिशन 2020 लखपती किसान स्मार्ट योजने’त विकासाची नवी दिशा दिल्याने येथील आदिवासींच्या चेह:यावर आनंद फुलला आहे.
धडगाव तालुक्यात सिनी टाटा ट्रस्टच्या क्लस्टर डेव्हलपमेंट प्लॅनअंतर्गत 21 गावांमध्ये ‘मिशन 2020 लखपती किसान स्मार्ट गाव योजना’ सुरू आहे. याअंतर्गत आदिवासी शेतक:यांना स्वयंरोजगार, शेतीतील उत्पन्नवाढीचे, जीवनमान बदलण्याचे प्रयोग राबवले जात आहेत. याच योजनेअंतर्गत मनवाणी खुर्द येथील आनंदटेंभापाडय़ात अनोखा प्रयोग राबविण्यात आला आहे. हा पाडा तसे अतिदुर्गम भागात विस्तारलेला. धडगाव शहरापासून साधारणत: 20 किलोमीटर अंतरावरचा हा पाडा. हमरस्त्यापासून काही अंतर पायी गेल्यानंतर पाडय़ात जाता येते. या पाडय़ात 24 कुटुंब वास्तव्याला आहेत. गावात पाण्याचे स्त्रोत नसल्याने लोकांकडे शेती असूनही ती हंगामीच. पिण्याच्या पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर पायपीट करून हातपंपावरून अथवा नदीतील झ:यावरून पाणी आणावे लागते. त्यामुळे येथील महिलादेखील त्रस्त झाल्या होत्या. गेल्या वर्षार्पयत हा पाडा पूर्णपणे परराज्यात रोजगारासाठी स्थलांतरित होत असे. यावर्षी चित्र वेगळे आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी टाटा ट्रस्टने या गावात कूपनलिका खोदली असून त्यावर सौरपंप बसविला आहे. पाडय़ातील प्रत्येक घरार्पयत जलवाहिनी टाकून पाण्याचे कनेक्शन दिले आहे.
आजच्या स्थितीला आनंदटेंभा पाडय़ातील प्रत्येक घरासमोर गिलकीच्या बागा बहरल्या असून त्यातून दर दोन-तीन दिवसांआड या कुटुंबांना दोन ते तीन हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. दूरवरून पाणी आणण्याचा त्रासही कमी झाल्याने शिवाय उत्पन्नही मिळू लागल्याने या पाडय़ातील आदिवासींच्या चेह:यावर आनंद फुलला आहे.
कूपनलिकेला पाणी मुबलक असल्याने आणि सौरपंप असल्याने 24 तास पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणी वाटपासाठी स्वतंत्र महिलांचा राणीकाजल पाणी वापर गट तयार करण्यात आला आहे. या गटातर्फे पाण्याचे नियोजन केले जाते. त्यासाठी प्रत्येक घरातून दर महिन्याला 100 रुपये वर्गणी गोळा केली जाते. शिवाय सदस्य फी म्हणून सुरुवातीला प्रती घर 500 रुपये जमा करण्यात आले आहेत.
हा सर्व निधी बँकेत जमा आहे. प्रत्येक घराला पाणी वापरासाठी व पिण्यासाठी जेवढे लागते त्यापेक्षा दुपटीने पाणी प्रती घराला मिळते. त्यामुळे या जादा पाण्याचा वापर परसबागेसाठी करण्यात आला आहे. प्रत्येक कुटुंबाने आपल्या घराजवळील किमान 10 गुंठे ते 20 गुंठे जागेत ही परसबाग फुलवली आहे. सध्या सर्व कुटुंबांना टाटा ट्रस्टतर्फे गिलकीचे बी देण्यात आले होते. हे बी टाकून प्रत्येकाने त्याठिकाणी तारेचा मंडप तयार केला आहे.
प्रत्येक रोपाला पाणी देण्यासाठी जवळच्या आरोग्य केंद्रातून निकामी झालेले सलाईनच्या बाटल्या वापरात घेतल्या आहेत. सलाईनच्या या बाटल्या खालून कापल्या आहेत व त्या उलटय़ा लावल्या आहेत. त्यात पाणी भरले जाते. ते पाणी सलाईनच्या नळीद्वारे थेंब थेंब अर्थात ठिबकप्रमाणे सोडले जाते. त्यामुळे पाण्याचा वापरही कमी होतो व रोपही चांगले वाढते.