पार्कींग जागांना दिला जातोय खो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 10:28 IST2020-12-18T10:28:16+5:302020-12-18T10:28:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  पालिका आणि खाजगी व्यापारी संकुलांमध्ये पार्कींगची पुरेशी व्यवस्थाच नसल्यामुळे शहरातील रहदारीचे तीनतेरा वाजले आहेत. ...

Parking spaces are being provided! | पार्कींग जागांना दिला जातोय खो!

पार्कींग जागांना दिला जातोय खो!

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  पालिका आणि खाजगी व्यापारी संकुलांमध्ये पार्कींगची पुरेशी व्यवस्थाच नसल्यामुळे शहरातील रहदारीचे तीनतेरा वाजले आहेत. वास्तविक व्यापारी संकुल उभारतांनाच  त्या आराखड्यात बेसमेंटला पार्कींगची सुविधा करण्याचे प्राविधान असते. असे असतांना एकाही व्यापारी संकुुलात अशी सोय नसल्याचे चित्र शहरातील व्यापारी संकुलांमध्ये आहे. 
            नंदुरबार शहरातील रस्ते आधीच अरुंद आहेत. त्यात अतिक्रमण वाढले आहे. दुसरीकडे वाहनांची संख्या वाढली असल्याने रहदारीही वाढली आहे. असे असतांना व्यापारी संकुले उभारतांना पार्कींगची सुविधाच राहत नसल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे ठिकठिकाणी रहदारी देखील रखडली आहे. त्यात कुणी रहदारीचा नियम मोडला तर विनाकारण वाहनचालकाला दंड भरावा लागतो. शहरात समविषम पार्कींग काही रस्त्यांवर करण्यात आली. परंतु त्याचा फारसा परिणाम झाला नाही. किंबहुना त्याची अंमलबजावणीच होऊ शकली नाही. यामुळे वाहनचालकांनी कुठे वाहन लावावी, बाजारात येतांना वाहने कुठे उभी करावी असे एक ना अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होतात.
                 बाजारात येणा-या महिला वर्गाला   तर याचा सर्वाधिक ताण सहन करावा लागतो. बाजारात कुणी दुकानदार दुकानासमोर वाहन उभे करू देत नाही.  दुचाकी वाहनांची ही स्थिती आहे. चार चाकी वाहनांचा तर प्रश्नच नाही.  शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर ही समस्या आहे. पालिकेेने व्यापारी संकुले उभारतांना या बाबींचा गांभिर्याने विचार करणे आवश्यक असतांना त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. शहरात कै.बटेसिंहभैय्या व्यापारी संकुलाच्या बेसमेंटला वाहनतळाची सुविधा आहे. परंतु त्याचा उपयोग फारच  कमी जण करतात. अनेकांना तर या ठिकाणी वाहनतळ आहे याचीच माहिती नाही. 
               अशीच स्थिती रेल्वे पट्टयापलिकडील भागात देखील आहे. त्या भागात देखील पालिका आणि खाजगी व्यापारी संकुले उभी राहिली आहेत. परंतु एकाही ठिकाणी वाहनतळाची जागा उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. 

वाहन बाजार की वाहनतळ

           शहरातील सर्वात मोठे व्यापारी संकुल म्हणून डीएसके मार्केट ओळखले जाते. या मार्केटमध्ये देखील वाहनतळाची पुरेशी सुविधा नाही. रस्त्याच्या बाजुला अपुऱ्या जागेत दाटीवाटीने वाहने उभी केली जातात. दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने सर्व एकाच ठिकाणी उभी राहतात. त्यामुळे हे वाहनतळ आहे की वाहनबाजार हाच प्रश्न पहाणाऱ्याला पडतो.

 रस्त्यावरच वाहने राहतात उभी

               आमदार कार्यालयासमोरील या कॅाम्पलेक्समध्ये तर वाहनतळच नाही. येथे बॅंका, विविव शोरुम्स, दुकाने, एटीएम केंद्र आहेत. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच येणाऱ्यांची वर्दळ असते. वाहन घेऊन येणाऱ्याला तर येथे मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते. वाहन कुठे उभे करावे हाच प्रश्न पडतो. रस्त्याच्या बाजुच्या वाहनांमुळे दुकानदारांना देखील अडचणीचे ठरते. 

एस.टी.चालकांना सर्वाधिक त्रास
               सर्वाधिक रहदारीचा असलेल्या बसस्थानकासमोरील बालाजी कॅाम्पलेक्स समोरील रस्त्यावर देखील मोठ्या संख्येने वाहने उभी राहतात. तीन मजली असलेल्या या कॅाम्पलेक्समध्येही वाहनतळ नाही. समोर देखील कॅाम्पलेक्स असल्यामुळे दोन्ही बाजुंनी वाहनांच्या रांगा असतात. अशा वेळी एस.टी.चालकाला मोठी कसरत करावी लागते. 

पे ॲण्ड पार्कींगची सोय करावी

             नंदुरबारात मध्यवर्ती भागांमध्ये पे ॲण्ड पार्कींगची सुविधा करणे गरजेचे आहे. दाटीवाटीच्या शहरात बाजारही दाटीवाटीने भरतो. त्यातच अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहन कुठे उभे करावे हा प्रश्न असतो. जर पे ॲण्ड पार्कींगची व्यवस्था झाली तर या समस्येवर तोडगा निघू शकतो. 

जास्तीत जास्त रोजगार निर्मितीसाठी
              शहरात आधीच मोकळ्या जागा कमी आहेत. आहे त्या ठिकाणीच व्यापारी संकुले उभारतांना जास्तीत जास्त गाळे बांधले जावे व त्यातून जास्तीत जास्तजास्त जणांना रोजगार मिळावा हा उद्देश असल्याचे पालिकेचे म्हणने आहे. 

बांधकामानंतर तपासणी हवी

             व्यापारी संकुलाचे बांधकामे झाल्यानंतर परवाणगीनुसार ते बांधले गेले का? याची तपासणी करण्याची यंत्रणाच नाही. त्यामुळेच पार्कींगच्या सुविधेबाबत देखील आलबेल असल्याचे दिसते.

 

Web Title: Parking spaces are being provided!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.