तापी काठावर केवळ पोलिसांचाच पहारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 12:53 IST2020-07-31T12:53:27+5:302020-07-31T12:53:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून यंदा प्रकाशा येथील तापी नदी घाटावर दशामाता मूर्ती ...

तापी काठावर केवळ पोलिसांचाच पहारा
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून यंदा प्रकाशा येथील तापी नदी घाटावर दशामाता मूर्ती विसर्जनाला ग्रामपंचायतीने ठराव करून बंदी केली होती. पोलीस प्रशासनानेही प्रकाशा गावाकडे येणाऱ्या ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. त्यामुळे बुधवारी रात्री कुणीही भाविक दशामाता मूर्ती विसर्जनासाठी येथे आले नाहीत. भाविकांनी आपापल्या गावीच विसर्जन केले. दरम्यान, येथील मंदिर परिसरात भाविकांऐवजी पोलीस बंदोबस्त दिसून आला.
गेल्यावर्षी २०१९ मध्ये दशामाता मूर्ती विसर्जनासाठी प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिर, संगमेश्वर मंदिर आदी ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी होती. त्यामुळे यात्रेचे स्वरूप होते. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश येथून हजारो भाविकांची वर्दळ प्रकाशा येथे होती. शेकडो मूर्तींचे विसर्जन गेल्यावर्षी हजारो भाविकांच्या साक्षीने रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत करण्यात आले होते. मात्र यंदा २०२० मध्ये कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊन असून येथील मंदिरेही बंद आहेत. दशामाता मूर्ती विसर्जनासाठी येथे होणाºया गर्दीमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू शकतो म्हणून प्रकाशा ग्रामपंचायतीने मासिक सभा घेऊन यंदा प्रकाशा येथे तापी नदीपात्रात भाविकांनी मूर्ती विसर्जनासाठी येऊ नये, असा ठराव केला होता. तसेच पोलीस प्रशासनानेही ग्रामपंचायतीच्या मदतीने गावोगावी फलक लावून मूर्ती विसर्जनाला प्रकाशा येथे नये, अशी जनजागृती केली होती. सोबतच सोशल मिडियाद्वारेही आवाहन करण्यात आले होते. पोलिसांनीही प्रकाशा गावाकडे येणाºया विविध ठिकाणी बंदोबस्त ठेवल्याने कुणीही भाविक येथे मूर्ती विसर्जनासाठी आले नाही. भाविकांनी आपापल्या गावी मूर्ती विसर्जन केले. बुधवारी रात्री अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी येथे येऊन आढावा घेतला. शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक किसन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आठ पोलीस अधिकारी, ६० पोलीस कर्मचारी, ४० होमगार्ड यांनी प्रकाशा बसथांबा, तोरडे पेट्रोल पंप, कोरीट नाका, गौतमेश्वर मंदिर, संगमेश्वर मंदिर आदी ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. जेणेकरून विसर्जनासाठी भाविकांना नम्रपणे त्यांना परत पाठवता येईल. तापी घाटावर पट्टीचे पोहणारे गावातील १५ जणांचे पथकही सज्ज ठेवण्यात आले होते. यासोबत ग्रामविकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी हेदेखील मुक्कामी थांबले होते. मंदिर ट्रस्टचे संचालक गुड्डू पाटील, सुरेश पाटील, गजानन भोई हेदेखील मदतीला होते. रात्रीचे १२ वाजले तरीही कोणी भाविक आले नाही. रात्री एक वाजता पावसाला सुरुवात होऊन सुमारे अर्धा-पाऊण तास पावसाच्या सरी कोसळल्या. स्वत: उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम रात्रभर सद्गुरू धर्मशाळेजवळ उपस्थित होते. पोलीस निरीक्षक किसन पाटील हे गावाच्या मेनरोडवरून आढावा घेत होते. पहाटेपर्यंत कुणीही भाविक मूर्ती विसर्जनासाठी आले नव्हते. नंदुरबार, तळोदा, शहादा, खेडदिगर आदी ठिकाणीही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ग्रामपंचायतीचा ठराव योग्य
प्रकाशा ग्रामपंचायतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मूर्ती विसर्जनाला येथील तापी नदीपात्रात येऊ नये, असा ठराव केला होता आणि तो योग्य ठरला. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यास मदत झाली एवढे मात्र नक्की. पोलीस अधिकारी व कर्मचारी व होमगार्ड आदी सायंकाळी सात वाजेपासून तर सकाळी सहा वाजेपर्यंत मंदिर परिसरात थांबून होते. रात्रभर त्यांनी जागरण केले. प्रकाशा बॅरेजचे लाईट बंद होते. तसेच केदारेश्वर मंदिरासमोरील हायमस्ट लॅम्पही गेल्या सहा महिन्यापासून बंद आहे. गौतमेश्वर मंदिरावरील हायमस्टदेखील गेल्या अनेक महिन्यापासून बंद असल्याने तेथे गस्त घालणारे पोलीस कर्मचारी पुलावर अंधारात बसले होते.