एसटीची ऑनलाइन बुकिंग सर्वच गाड्यांना प्रतिसाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:32 IST2021-08-26T04:32:47+5:302021-08-26T04:32:47+5:30

नंदुरबार : रेल्वेप्रमाणेच १० वर्षांपूर्वी एसटीने जागा आरक्षणाची सोय केली होती. गत १० वर्षांत या सोयीला प्रतिसाद मिळत असल्याचे ...

Online booking of ST responds to all trains! | एसटीची ऑनलाइन बुकिंग सर्वच गाड्यांना प्रतिसाद!

एसटीची ऑनलाइन बुकिंग सर्वच गाड्यांना प्रतिसाद!

नंदुरबार : रेल्वेप्रमाणेच १० वर्षांपूर्वी एसटीने जागा आरक्षणाची सोय केली होती. गत १० वर्षांत या सोयीला प्रतिसाद मिळत असल्याचे सातत्याने समोर आले आहे. लांब पल्ल्यासोबत आसपासच्या शहरांसाठी ऑनलाइन बुकिंग करून, सीट आरक्षित करण्यात येत असल्याने, अनेकांचा प्रवास सुखकर झाला आहे.

गत दीड वर्षात एसटीची प्रवासी संख्या कमी झाली असली, तरी सणासुदीच्या काळात घरापर्यंत सोडणारी एसटीच असल्याने अनेक जण तिचा आधार घेत आहेत. यात बाहेरगावाहून येणारे ऑनलाइन बुकिंग करण्यास प्राधान्य देत आहेत. एसटी महामंडळाच्या पोर्टलसह खासगी ॲपवरूनही बसचे सीट बुक होत असल्याने नागरिकांच्या जागेच्या अडचणी दूर झाल्या आहेत. लगीनसराई आणि सणांच्या काळात बहुतांश जण या पर्यायाचा वापर करू लागल्याने एसटीचे उत्पन्न वाढत असल्याचे सांगण्यात आले.

असे करावे ऑनलाइन बुकिंग

msrtc.Maharashtra.gov या संकेतस्थळावर ऑनलाइन बुकिंग या लिंकवर गेल्यास पब्लिक ऑनलाइन रिझर्व्हेशन सीस्टिममध्ये नोंदणी करून सीट बुक करता येते.

प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने मोबाइल ॲप डेव्हलप केले आहे. हे ॲप प्लेस्टोअरमधून डाऊनलोड करून घेतल्यास राज्यातील कोणत्याही मार्गावरील बसचे आरक्षण तातडीने करता येते.

शिक्षणासाठी मुले पुण्यात शिकत असल्याने एसटीच्या या सेवेची माहिती आहे. मुलांना घरी येण्यासाठी खासगी बस उपलब्ध न झाल्यास ते ऑनलाइन बुकिंग करून एसटीत जागा मिळवितात. नागरिकांनीही याचा लाभ घेतल्याने अडचणी दूर होती.

- देवेंद्र पाटील, नंदुरबार.

सणासुदीच्या काळात ही सोय अधिक चांगली आणि सक्षम अशी आहे. नागरिकांनी या ॲपचा वापर केला पाहिजे. ऑनलाइन बुकिंगमुळे जागेचा प्रश्न सुटून होणारे वादही टळतात आणि प्रवासात जागा मिळणार किंवा कसे, अशी लागणारी चिंताही कमी होते.

- प्रवीण पाटील, नंदुरबार.

एसटीची ऑनलाइन बुकिंग सेवा सर्वांसाठी उपलब्ध आहे. नागरिकांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. यातून गर्दीवर नियंत्रण मिळून प्रत्येक प्रवाशाचा प्रवास हा अधिक सुखकर आणि विनात्रासाचा होणार आहे. नागरिकांनी ऑनलाइनची माहिती घेतली पाहिजे.

- मनोज पवार, आगारप्रमुख, नंदुरबार.

Web Title: Online booking of ST responds to all trains!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.