कार-दुचाकी अपघातात एक ठार, दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 12:21 IST2021-02-04T12:21:50+5:302021-02-04T12:21:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा/कळंबू : सारंगखेडा ते कुकावल रस्त्यावर भरधाव मोटारसायकलने चारचाकीला धडक दिल्याने एक ठार तर दोघे जण ...

कार-दुचाकी अपघातात एक ठार, दोन जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा/कळंबू : सारंगखेडा ते कुकावल रस्त्यावर भरधाव मोटारसायकलने चारचाकीला धडक दिल्याने एक ठार तर दोघे जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
मंगळवारी सायंकाळी कुकावल गावाकडून सारंगखेड्याकडे जाणा-या एमएच ३९ जी २४४७ या वाहनाला कळंबूकडून भरधाव वेगात येणा-या मोटारसायकलीने धडक दिली. भरधाव वेगात असलेल्या या दुचाकीवर तिघे जण होते. धडक जोरदार असल्याने तिघेही लगतच्या चारीत फेकले गेले तर चारचाकी वाहनाची एअरबॅग निघून चारचाकी चालक त्यातून बचावला. या अपघातात मोटारसायकलवरील वर्षीय अजय गुलाब पावरा (२०) हा युवक जागीच ठार झाला तर अजय युवराज गवळे (वय २०) आणि अजय सुमेरसिंग बागुल (वय २४) हे दोघेही गंभीर जखमी झाले. कळंबू गावालगत झालेल्या अपघाताची माहिती मिळताच सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी घटनास्थळी भेट देत जखमी आणि मयताची ओळख पटवली. याबाबत अविनाश सुरेश बागुल यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन कारचालक राकेश भटू सनेर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमींना तातडीने शहादा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. याठिकाणी त्यांच्यावर डाॅ. पवन बेहरे यांनी प्रथमोपचार पूर्ण केले. मृतदेह पालकांना सोपवण्यात आला. त्याच्या कुटूूंबियांचा यावेळी शोक अनावर झाला होता. अपघातातील तिघेही युवक हे कुकावल येथील रहिवासी आहेत. मंगळवारी सारंगखेडा येथे दुचाकीने खाजगी कामासाठी आले होते. तिघांचे प्रथम नाव अजयच असल्याने त्यांच्या मैत्रीची नेहमीच चर्चा होती.