अंगावर पेट्रोल टाकत जाळून घेतल्याने एकाचा मृत्यू
By मनोज शेलार | Updated: April 10, 2024 17:07 IST2024-04-10T17:04:57+5:302024-04-10T17:07:16+5:30
सिकंदर याने जाळून घेतल्याची बाब ग्रामस्थांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधला.

अंगावर पेट्रोल टाकत जाळून घेतल्याने एकाचा मृत्यू
नंदुरबार : नवापूर तालुक्यातील झरीपाडा येथील एकाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. कारण समजू शकले नाही. याबाबत विसरवाडी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
सिकंदर वळवी (४०) असे मयताचे नाव आहे. सिकंदर याने जाळून घेतल्याची बाब ग्रामस्थांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधला. परंतु, दीड तासापर्यंत रुग्णवाहिका आली नाही. त्यामुळे खांडबारा येथील सरपंच अविनाश गावित यांच्याशी नातेवाइकांनी संपर्क साधला असता त्यांनी स्वत: झरीपाडा येथे धाव घेऊन स्वतःच्या वाहनाने सिकंदर वळवी यांना गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने वेळेवर उपचार मिळू शकला नाही. याबाबत सरपंच अविनाश गावित व ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. गेल्या सहा महिन्यांपासून खांडबारा ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध नाही. खांडबारा रुग्णालयास नियमित रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यास आंदोलनाचा इशारादेखील ग्रामस्थांनी दिला आहे.