कोरोनाबाधितांची संख्या सात हजाराच्या पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 13:03 IST2020-12-16T13:03:14+5:302020-12-16T13:03:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सात हजाराच्या पुढे गेली आहे. ऑक्टोबर महिन्यात मंदावलेला कोरोना संसर्गाने ...

कोरोनाबाधितांची संख्या सात हजाराच्या पार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सात हजाराच्या पुढे गेली आहे. ऑक्टोबर महिन्यात मंदावलेला कोरोना संसर्गाने गती पकडल्याने ही रुग्ण संख्या वाढली आहे. मंगळवारी दिवसभरात ३४ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर रुग्णसंख्येत वाढ झाली.
सोमवारी रात्री कोरोनाबाधितांची एकूण ६ हजार ९८८ होती. सायंकाळी आलेल्या अहवालात ८० पैकी ३४ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर ही संख्या सात हजाराच्या पुढे गेली आहे. दरम्यान मंगळवारी दिवसभरात थेट १२१ जणांना घरी सोडण्यात आले. यामुळे आजवर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही साडेसहा हजार एवढी झाली आहे. एकीकडे १२१ रुग्ण बरे होवून घरी जात असताना दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातून आजवर मृत्यू झालेल्यांची संख्या ही १६३ झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाची रुग्णसंख्या सात हजाराच्या पुढे गेली असताना शहादा आणि नंदुरबार या दोन शहरातच पाच हजार रुग्ण समोर आल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक २ हजार ६९९ रुग्ण हे आजवर शहाद्यात तर २ हजार ६४३ रुग्ण हे नंदुरबार शहर व तालुक्यात आढळून आले आहेत. या दोन्ही शहर आणि तालुक्यात नवीन रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढल्या आहेत. दरम्यान रुग्णसंख्या वाढली असताना आरोग्य विभागाने स्वॅब संकलनही वाढवले आहे. आतापर्यंत ३८ हजार नागरीकांचे स्वॅब घेतले गेले आहेत.