एनआरएचएमने दुर्गम भागात बांधलेल्या इमारती निकृष्टच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 11:34 IST2019-04-05T11:33:41+5:302019-04-05T11:34:17+5:30
जिल्हा परिषद : स्थायीच्या सभेत सदस्यांचा आरोप

एनआरएचएमने दुर्गम भागात बांधलेल्या इमारती निकृष्टच
नंदुरबार : एनआरएचएमअंतर्गत दुर्गम भागात आरोग्य विभागाने बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती ह्या निकृष्ट दर्जाच्या असून त्यांची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत करण्यात आली़ मागणीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा व जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांनी संबधितांची चौकशी करण्याचे तोंडी आदेश अधिकाऱ्यांना दिले़
जिल्हा परिषदेच्या मिटींग हॉलमध्ये ही सभा घेण्यात आली़ सभेस उपाध्यक्ष सुहास नाईक, अर्थ समिती सभापती दत्तू चौरे, समाजकल्याण सभापती आत्माराम बागले, उपमुख्य कार्यकारी मनिष सांगळे, सदस्य रतन पाडवी, सागर तांबोळी यांच्यासह सर्व विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते़ सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षा रजनी नाईक होत्या़ प्रारंभी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले़ यानंतर विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला़ आयत्या वेळच्या विषयात पाणीटंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेकडून विंधनविहिरींसाठी ५० लाख रुपयांचा निधी यंदा वितरीत करण्यात आला होता़ यांतर्गत झालेल्या कामांबाबत विचारणा करण्यात आली़ या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिरंगाई होत असल्याचा आरोप समितीच्या सदस्यांकडून करण्यात आला़ ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता पी़टी बडगुजर यांनी योग्य माहिती न दिल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली़ धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात विंधनविहिरींची खोदाई न करताच बिले काढल्याचा आरोप उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी केला़ तर सदस्य रतन पाडवी यांनी गेल्या वर्षाची कामे यंदा सुरुच असल्याची माहिती दिली़ पाणीटंचाई गंभीर स्वरुप धारण करत असताना दोन्ही तालुक्यात केवळ ४० विंधनविहिरींची कामेच पूर्ण झाल्यामुळे नाराजी व्यक्त केली गेली़
मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी खोदाईचे कंत्राट दिलेल्या ठेकेदारांची चौकशी करणार असून दुर्गम भागाकडे विशेष लक्ष देणार असल्याचेही आश्वासन दिले़ तसेच टंचाई काळात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कामाचा आढावा घेणार असल्याची माहितीही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली़