रेल्वेस्टेशनवर कुणी प्लॅटफाॅर्म तिकीट काढेना; पार्किंगलाही प्रतिसाद शून्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:32 IST2021-08-26T04:32:43+5:302021-08-26T04:32:43+5:30

नंदुरबार : कोरोनामुळे बंद असलेली रेल्वे पुन्हा वेगात धावू लागली आहे. यात विविध मार्गांनी उत्पन्न वाढीसाठी रेल्वे प्रयत्न करत ...

No platform tickets at the train station; The response to parking is also zero | रेल्वेस्टेशनवर कुणी प्लॅटफाॅर्म तिकीट काढेना; पार्किंगलाही प्रतिसाद शून्यच

रेल्वेस्टेशनवर कुणी प्लॅटफाॅर्म तिकीट काढेना; पार्किंगलाही प्रतिसाद शून्यच

नंदुरबार : कोरोनामुळे बंद असलेली रेल्वे पुन्हा वेगात धावू लागली आहे. यात विविध मार्गांनी उत्पन्न वाढीसाठी रेल्वे प्रयत्न करत आहे. प्रामुख्याने प्लॅटफाॅर्म व पार्किंग यातून काहीअंशी कमाई करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतू प्रवासी आणि त्यांना सोडण्यासाठी येणारे नातलग या प्रयत्नांना दाद देत नसल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील मोठे आणि महत्त्वाचे म्हणून नंदुरबार रेल्वेस्टेशन परिचित आहे. उधना-जळगाव मार्गावर सर्वच गाड्यांना येथे थांबा असल्याने प्रवाशी आणि त्यांना सोडण्यासाठी आलेल्या नातेवाईकांची येथे वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर वाहन पार्किंग आणि प्लॅटफाॅर्म तिकिटासाठी दर निर्धारित आहेत. परंतू बहुतांश जण याकडे दुर्लक्ष करत आहेत. रेल्वे प्रशासनही कारवाई करत नसल्याने सहसा कोणी प्लॅटफाॅर्म तिकिटाची मागणी करताना दिसून येत नाही.

नंदुरबार रेल्वेस्थानकातून कोरोना पूर्वी साधारण १० हजारापेक्षा अधिक प्रवासी मार्गस्थ होत होते. गत दीड वर्षात ही संख्या कमी झाली आहे. जूनपासून गाड्या सुरळीत झाल्या असल्याने प्रवाशांची संख्या वाढत आहे. यात प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री मात्र नगण्य असल्याचे सांगण्यात आले. १० मधून दोनच जण प्लॅटफाॅर्म तिकिट घेतल्याचे सांगण्यात आले. प्लॅटफाॅर्म तिकिटातून येणारा पैसा हा रेल्वेस्थानकाच्या विकासासाठी खर्च केला जातो. परंतू नंदुरबार रेल्वेस्थानकावर हवे तेवढे तिकिटे विक्री होत नसल्याने हवी तेवढी रक्कम जमत नसल्याचे सांगण्यात आले. रेल्वेस्थानकातील या समस्येबाबत रेल्वेकडून लवकरच कारवाई केली जाणार आहे.

जिल्ह्यातील रेल्वेस्थानकांवर प्लॅटफाॅर्म तिकिटचे दर १० रुपये आहेत. कोरोना काळात या तिकिटाचे दर ५० रुपयांवर गेले होते. परंतु आता पुन्हा १० रुपये दर आहेत. परंतु प्रवासी प्लॅटफाॅर्म तिकिट काढत नसल्याचे दिसून आले.

पार्किंगचा ठेका देवूनही लाभ होईना..

नंदुरबार रेल्वेस्थानकावर पार्किंगसाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. ठेकेदाराकडून दिवसाचे १० रूपये निश्चित करण्यात आले आहेत. चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी वेगवेगळे दर आहेत. परंतू बहुतांश जण याठिकाणी वाहने लावत नसल्याचे प्रकार घडतात.स्थानकासमोर वाहने लावत आत जाणारे नंतर संबधित ठेेकेदारासोबत हुज्जत घालत असल्याचे प्रकार सतत घडतात.

प्रतिसाद शून्यच

पॅसेंजर गाड्यांसह, अहमदाबाद-हावडा, नवजीवन आदी गाड्या रेल्वेस्थानकात आल्यावर प्रवाशांना घेण्यासाठी तसेच त्यांना सोडण्यासाठी गर्दी होते. यावेळी प्लॅटफाॅर्म तिकिट घेण्याचे टाळले जात असल्याचे समोर आले आहे. रेल्वेच्या उदघोषकांकडून सातत्याने तिकीट घेण्याच्या सूचना करुनही तिकीट घेतले जात नाहीत. सोबतच तपासणी करणाऱ्यांसोबत अनेक जण हुज्जत घालून पळ काढत असल्याचे दिसून आले.

गाडी जास्त वेळ थांबत नाही. तिकिटासोबत प्लॅटफाॅर्म तिकिट घेणे अपेक्षित असते. परंतू अनेकजण ते तिकिट काढत नाहीत. प्लॅटफाॅर्म तिकिट नियमित काढत आलो आहे. इतरांनीही ते काढावे यासाठी आग्रही असतो. - प्रवासी

प्रवाशांनी प्लॅटफाॅर्म तिकिट हे घेतलेच पाहिजे. विना प्लॅटफाॅर्म तिकिट घेत स्थानकावर फिरणे गुन्हा असतो. यातून दंडात्मक कारवाई होवून नाहक मनस्ताप होवू शकतो.

- प्रवासी

Web Title: No platform tickets at the train station; The response to parking is also zero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.