जनजागृतीचा नवा आदर्श, पावरी भाषेतील शाॅर्ट फिल्म करणार काेरोना समस्येला स्पर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:31 IST2021-05-11T04:31:50+5:302021-05-11T04:31:50+5:30
धडगाव : कोरोनाबाबत अनेक गैरसमज आहेत. यामुळे प्रतिबंधात्मक उपाय, कोरोना लागण झाल्यास त्यावर उपचार आणि लस घेण्यासही सातपुड्यात अनेकांकडून ...

जनजागृतीचा नवा आदर्श, पावरी भाषेतील शाॅर्ट फिल्म करणार काेरोना समस्येला स्पर्श
धडगाव : कोरोनाबाबत अनेक गैरसमज आहेत. यामुळे प्रतिबंधात्मक उपाय, कोरोना लागण झाल्यास त्यावर उपचार आणि लस घेण्यासही सातपुड्यात अनेकांकडून नकार दर्शविला जातो. या नकाराला होकारात बदलता यावे, यासाठी स्थानिक आदिवासी युवकांनीच पुढाकार घेतला असून, शाॅर्ट फिल्मचा आधार घेत हे युवक स्थानिक आदिवासी बोलीभाषेतून जनजागृती करण्याचा अभिनव प्रयोग करीत आहेत.
धडगाव येथील आदिवासी जनजागृती टीम आणि उलगुलान फाउंडेशन यांच्या प्रयत्नातून या शाॅर्ट फिल्म तयार करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली असून, या शाॅर्ट फिल्म सध्या दुर्गम भागात धुमाकूळ घालत आहेत. धडगाव आणि परिसरातील आदिवासी युवकांनी गेल्या एक महिन्यात आदिवासी पावरी बोलीभाषेत ऑक्सिजन, मास्क, कोरोना लस, कोरोना वालाबाबा या नावाने शाॅर्ट फिल्म बनवून त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्मार्ट फोन वापरणाऱ्यांपर्यंत पोहोचविल्या आहेत. यातून माहितीचा प्रचार व प्रसार होऊन अनेक गोष्टींवर भाष्य झाल्याचे सांगण्यात आले आहे. यातून मास्कचा वापर कसा करावा, कोरोनाबद्दलची माहिती, संसर्ग कसा होताे, उपचार कोठे व कसा मिळतो, ऑक्सिजन केव्हा हवा, यासह अनेक बाबींवर चर्चा करण्यात येत आहे. अर्जुन पावरा, राकेश पावरा, कल्पेश पावरा, दीपक पावरा, किरण पावरा, वर्षा शेल्टे यांनी लघुचित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. सोशल मीडिया आणि यू-ट्युबवर उपलब्ध असलेल्या या व्हिडीओला तयार करण्यासाठी १०० टक्के मोबाइलचा वापर केला जाताे. शाॅर्ट फिल्मचे दिग्दर्शन टीममधील युवकांपैकी एखादा करतो. संगीत, व्हिडीओचे एडिटिंग हे मोबाइलमधील ॲपमधून केले जाते. लोकेशन म्हणून धडगाव व हरणखुरी परिसरातील एखादे घर किंवा शेत निवडून त्याठिकाणी काही तासांत शूट करून एका दिवसात व्हिडीओ रिलीज केला जातो. जिल्ह्यातील चार तालुक्यांतील सुमारे तीन हजारपेक्षा अधिक नागरिकांनी आठवडाभरात या शाॅर्ट फिल्म पाहून पसंती दिली आहे.
सातपुड्यात लस घेतल्याने माणूस मरतो, यासोबत इतर अनेक अफवा आहेत. यातून दुर्गम भागात लसीकरणाचा टक्का कमी आहे. या मुद्द्यावर भर देत जनजागृती टीमने नागरिकांच्या भावनाही जाणून घेतल्या होत्या. यावेळीही लसीकरणाबाबत सकारात्मक अशी भूमिका घेण्यात आली नसल्याने जनजागृतीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उलगुलानचे सहसंस्थापक राकेश पावरा यांनी दिली.
दुर्गम भागातील गावपाड्यांवर जाऊन शिक्षित युवकांनी मास्कचा वापर वाढविणे व कोरोना लसीकरण यावर भाष्य करत आहेत. यावेळी त्यांच्याकडून मोबाइलचा आधार घेत कोरोनावाला बाबा ही शाॅर्ट फिल्म दाखविण्यात आली. यातून अनेकांचा गैरसमज दूर झाल्याचा दावा करण्यात आला. यातून अनेकांनी लस घेण्यासाठी स्वेच्छेने आरोग्य केंद्रांमध्ये हजेरी लावल्याची माहिती देण्यात आली. या जनजागृतीवर शाॅर्ट फिल्म धडगावसोबत अक्कलकुवा, शहादा व तळोदा तालुक्यांतील आदिवासी बांधवांपर्यंतही पाेहोचविल्या जात आहेत.
गेल्या वर्षीदेखील लॉकडाऊनमध्ये व्हिडीओ बनवून समाजात जनजागृती करीत होतो. या कामासाठी आदिवासी जनजागृती टीमला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली होती. यंदाही जनजागृतीची ही मोहीम कायम ठेवली आहे.
-नितेश भारद्वाज, संस्थापक, उलगुलान फाउंडेशन