शहादा-डोंगरगाव रस्त्याच्या दुतर्फा असलेला सर्व्हीस रोडवरील अतिक्रमण काढण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:39 IST2021-02-25T04:39:20+5:302021-02-25T04:39:20+5:30
सन १९९० नंतर शहराचा विस्तार प्रामुख्याने पूर्वेकडील भागात शहादा डोंगरगाव रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झाला. अनेक नागरिकांनी या ...

शहादा-डोंगरगाव रस्त्याच्या दुतर्फा असलेला सर्व्हीस रोडवरील अतिक्रमण काढण्याची गरज
सन १९९० नंतर शहराचा विस्तार प्रामुख्याने पूर्वेकडील भागात शहादा डोंगरगाव रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झाला. अनेक नागरिकांनी या भागात रहिवास व व्यवसाय प्रयोजनासाठी जागा घेण्यास पसंती दिल्याने अल्पावधीतच या भागात नवीन शहराची निर्मिती झाली. अनेक वसाहती निर्माण झाल्या तर व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या व्यापारी संकुलांची ही निर्मिती झाली. त्यातच गेल्या काही वर्षांमध्ये या भागात मोठमोठाले दवाखाने सुरू झाल्याने एक प्रकारे हा रस्ता शहरातील मेडिकल हब म्हणून नावारूपास आला आहे. शहराचा विस्तार होत असल्याने या भागातील अनेक शेतजमीन मालकांनी नियमानुसार अकृषिक परवाना घेऊन त्याची खरेदी विक्री केली. टाऊन प्लॅनिंग व महसूल विभागामार्फत अकृषिक परवाना देताना शहादा डोंगरगाव रस्ता हा मुख्य मार्ग असल्याने या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सहा मीटरचे सर्विस रोडसाठी जागा निश्चित करून अकृषिक परवानगी दिली आहे. त्यानंतरच आवश्यक ते नकाशे मंजूर केले आहेत.
रेसिडेन्सी चौक ते डोंगरगाव चौफुली येथील बिरसा मुंडा चौक या भागात मुख्य धावपट्टीच्या दोन्ही बाजूला पाटचारी व त्यानंतर सहा मीटरच्या सर्विस रोडसाठी जागा सोडल्यानंतर नियमानुसार अकृषिक परवानामध्ये बिल्डिंग लाईन मंजूर केली असून, त्या लाईनच्या आतच संबंधित जागा मालकाने नियमानुसार बांधकाम करणे बंधनकारक असताना अनेकांनी या अटीची पूर्तता न करता सर्व्हिस रोडच्या जागेवरच व्यापारी संकुलाची निर्मिती करून दरमहा हजारो रुपये भाडे कमावण्याचा उद्योग सुरू केला आहे तर अनेक धनिकांनी आपल्या बंगल्याचे वॉल कम्पाऊंड टाकून रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या सहा मीटरच्या सर्व्हिस रोडचे अस्तित्व मिटवून टाकले आहे. विशेष म्हणजे या धनिकांनी केलेल्या अतिक्रमणावर सार्वजनिक बांधकाम विभाग व पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केले आहे.
या रस्त्याच्या मुख्य धावपट्टीचे काँक्रीटीकरण पूर्ण झाल्यानंतर यावरून रहदारी मोठ्याप्रमाणात वाढणार आहे. पादचाऱ्यांसाठी व्यवस्था नसल्याने वाहनांच्या कमाल वेगामुळे व नवीन वसाहतींना जोडणाऱ्या अप्रोच रस्त्यांमुळे अपघातांची संख्या वाढणार असल्यामुळे सर्विस रोडचे महत्व लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने आत्ताच दोन्ही बाजूचे सर्विस रोड मोकळे करणे ही काळाची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व पाटबंधारे विभाग अस्तित्व गमावून बसलेल्या दोन्ही सर्विस रस्त्यांना नव्याने पूनर्जन्म देण्यासाठी यावरील अतिक्रमण काढण्यासाठी शुभ मुहूर्त शोधून कारवाई करणार का? हे सर्वच रस्ते सर्वसामान्य नागरिकांना दळणवळणासाठी खुले होतील का? असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झाले असून, यावर वेळीच उपाययोजना झाली नाही तर भविष्यात या रस्त्याचा हा भाग हा मृत्यूचा सापळा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.