स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मशरूम शेतीला प्राधान्य देण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:32 IST2021-08-23T04:32:22+5:302021-08-23T04:32:22+5:30
सातपुड्यात मशरूम शेतीचे मार्गदर्शक वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली मशरूम शेतीला चालना मिळत आहे. विशेषत: घरच्या घरी राहून महिलांना मशरूम शेती ...

स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मशरूम शेतीला प्राधान्य देण्याची गरज
सातपुड्यात मशरूम शेतीचे मार्गदर्शक वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली मशरूम शेतीला चालना मिळत आहे. विशेषत: घरच्या घरी राहून महिलांना मशरूम शेती करता येऊ शकते. महिलादेखील स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आत्मनिर्भर होऊ शकतात. यासाठी मशरूम शेती व्यवसायाचे जिल्हाधिकारी यांनी कौतुक केले होते. जिल्ह्यात मशरूम शेतीचा उपक्रम राबविणारे राजेंद्र वसावे यांनी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची भेट घेऊन त्यांना पिंक मशरूम भेट म्हणून दिली. तसेच जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांना मशरूम शेती कशाप्रकारे केली जाते, मशरूमपासून कोणकोणते व्यंजने तयार केले जातात, याला बाजारपेठ कशी उपलब्ध होऊ शकते, तसेच सातपुड्यात असलेले पर्यटनस्थळ तोरणमाळ, उनपदेव, डाब देवगोई, बाहागुबारा मध्य प्रदेश ते गुजरातच्या सीमेपर्यंत सातपुड्यातील अनेक पर्यटन स्थळांजवळ व जिल्ह्यातील तालुक्यात स्टॉल लावून फ्रेश मशरूम व मशरूमचे वेगवेगळे व्यंजने तयार करून विक्री करून स्वयंरोजगार निर्माण करू शकतो.
मशरूम शेती विनामाती व पाण्याची असून ती घरातल्या घरात कोणीही करू शकतो. विशेषत: घर सांभाळणाऱ्या महिलांना मशरूम शेती ही वरदान असून, त्यातून रोजगार निर्माण होऊन स्वतः आत्मनिर्भर होऊ शकत असल्याची माहिती दिली. सोबतच मशरूममध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने असल्याने सातपुड्यातील कुपोषण कमी होण्यासाठी फार मोठी मदत होऊ शकते, असेही वसावे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री व जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी, मजुरांच्या स्थलांतराला आळा बसणे शक्य होणार असेल, तर मशरूम शेती व्यवसायासाठी निश्चितपणे साहाय्य केले जाईल असे सांगितले.
यावेळी ॲड. संग्रामसिंग पाडवी, जितेंद्र तडवी उपस्थित होते.