नंदुरबारचा कोरोनाबाधीत मृत्यूदर ९.३७ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 12:34 IST2020-05-30T12:33:03+5:302020-05-30T12:34:21+5:30
मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात आतापर्यंत ३२ कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तीन जणांचा ...

नंदुरबारचा कोरोनाबाधीत मृत्यूदर ९.३७ टक्के
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात आतापर्यंत ३२ कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा मृत्यूदर हा ९.३७ टक्के इतका आहे. शेजारील जिल्ह्यांच्या मानाने तो कमी असला तरी देशाच्या मानाने तो सर्वाधिक आहे. मृत्यू झालेल्यांंचा वयोगट हा युवक मध्यम वयस्क वे वृद्ध असा आहे. सध्या १० रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण १८ एप्रिल रोजी नंदुरबारात आढळून आला होता. त्यांच्याच परिवारातील इतर तीनजण देखील आढळून आले होते. नंतर शहादा व त्या पाठोपाठ अक्कलकुवा येथे रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक १७ रुग्ण नंदुरबार तालुक्यातील आहेत. त्या खालोखाल ११ रुग्ण हे शहादा तालुक्यातील आहेत.
अक्कलकुवा तालुक्यात चार रुग्ण होते. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जिल्ह्यात ९.३७ टक्के इतके आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये शहादा येथील ३२ वर्षीय युवक, नंदुरबार येथील ७० वर्षीय वृध्दा आणि हिंगणी, ता.शहादा येथील ५१ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. याचा अर्थ जिल्ह्यात तरुण, मध्यम वयाचा आणि वृद्ध अशा वयोगटातील रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण देखील बऱ्यापैकी आहे. ३२ रुग्णांपैकी १९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या १० रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. याशिवाय बामखेडा, ता.शहादा येथील रुग्ण हा नाशिक येथे डिटेक्ट झाला आहे.
सोमावल, ता.तळोदा येथील मयत गरोदर महिला देखील नाशिक येथेच डिटेक्ट झाल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही रुग्णांची नोंद ही नाशिक येथे करण्यात आली आहे.
आठवडानिहाय मृत्यू संख्या
१८ ते २६ एप्रिल - १
८ ते १५ मे- १
२२ ते २९ मे- १
नंदुरबार व हिंगणी येथील अनुक्रमे वृद्धा व व्यक्ती हे अहवाल येण्याच्या आधीच मृत्यू झाले होते. तर शहादा येथील रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला होता.
कोरोनाबाधीतांचा वयोगट
०५ ते २० वर्ष - ०३
२० ते ४०- १२
४० ते ६०- १३
६० ते ८०- ०४
तपासणी व अहवाल
१,२८३ जणांची तपासणी
१,२०९ जण निगेटिव्ह
३२ जण पॉझिटिव्ह
३४ अहवाल प्रलंबीत
१९ कोरोनामुक्त
परजिल्हा व राज्यातून आलेले लोकं
नंदुरबार तालुक्यात २१ हजार ३७५़
नवापुर तालुक्यात ४ हजार ९२५़
तळोदा तालुक्यात ८ हजार ९११़
शहादा तालुका-७ हजार ३०३़
अक्कलकुवा ८ हजार ८६३़
तर धडगाव तालुक्यात ९ हजार ४८५ नागरिकांनी प्रवेश केला होता़
एकूण ६० हजार ८६२ जिल्ह्यात प्रवेश केला.
जिल्ह्यात कोरोना मृत्यूदर हा दहा टक्केचा आत आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात चांगले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात जिल्ह्यात बऱ्यापैकी यश आले आहे.
-डॉ.आर.डी.भोये, जिल्हा शल्य चिकित्सक. नंदुरबार.