नंदुरबार वार्तापत्र- समितीचा दौरा आणि आरोग्य सेवेचे वाभाढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 11:42 IST2020-11-05T11:42:11+5:302020-11-05T11:42:19+5:30
मनोज शेलार लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील आरोग्य सेवेचे वाभाडे पुन्हा एकदा निघाले आहेत. आरोग्य सचिवांसह आलेल्या ३५ ...

नंदुरबार वार्तापत्र- समितीचा दौरा आणि आरोग्य सेवेचे वाभाढे
मनोज शेलार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील आरोग्य सेवेचे वाभाडे पुन्हा एकदा निघाले आहेत. आरोग्य सचिवांसह आलेल्या ३५ अधिकाऱ्यांच्या पथकाने जिल्ह्यातील सर्व ६० आरोग्य केंद्र, सर्व ग्रामिण रुग्णालयांमध्ये जाऊन आरोग्य सेवेची माहिती घेतली. त्या त्या गावातील जनतेशीही संवाद साधला. तीन दिवसांच्या या तपासणीत आरोग्य सेवेतील अनेक त्रुटी निघाल्या, काही तक्रारी झाल्या. परंतु आरोग्य प्रधान सचिवांनी तिसऱ्या दिवशी घेतलेल्या आढावा बैठकीत त्याचा उहापोह केला असला तरी त्याची धार कमीच राहिली. दुसरीकडे प्रशासनाने स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानली.
आकांक्षीत जिल्ह्याअंतर्गत कोरोना साथीनंतर जिल्ह्यातील नॅान कोरोना कार्यप्रणालीची स्थिती, जनतेस सेवा देण्यात येणाऱ्या अडचणी याबाबत पहाणीसाठी राज्यस्तरीय ३५ अधिकाऱ्यांचे पथक तीन दिवस जिल्ह्यात तळ ठोकुन होते. अधिकाऱ्यांचे आठ गट तयार करून त्यांना प्रत्येकी एक तालुका वाटप करण्यात आला. त्यांनी सर्व ६० आरोग्य केंद्र, सर्व ग्रामिण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांमध्ये जाऊन आरोग्य सेवेची माहिती घेतली. धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागात जाऊन त्यांनी काही ठिकाणी ग्रामस्थांशी देखील संवाद साधला. अनेक ठिकाणी नागरिकांनी आरोग्य सेवेचे वाभाडे काढले. दुर्गम भागात बालमृत्यू, माता मृत्यू, सिकलसेल, सर्पदंशावरील लस यासह इतर सेवेविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली. तरंगता दवाखान्याचा उद्देश सफल होत नसल्याचेही निदर्शनास आणून दिले. कोट्यावधींचा येणारा निधी जातो कुठे असा प्रश्न सहाजिकच उपस्थित झाला.
अनेक आरोग्य केंद्रात तर परिचरच दवाखाने चालवीत असल्याच्या तक्रारी आल्या. आरोग्य अधिकारी उपस्थित राहतच नसल्याचे चित्र समोर आले. एका आरोग्य केंद्रातील एका महिला रुग्णाच्या केसपेपरवर तीन जणांनी तीन प्रकारचे प्रिकीप्शन लिहून दिल्याचा प्रकार एका पथकाच्या निदर्शनास आला. या एका उदाहरणावरून दुर्गम भागातील जनतेच्या आरोग्याशी कसे खेळले जाते याचा अंदाज येतो. आरोग्य विभागात तर अनेक अशी पदे आहेत ती ना जनतेला माहिती ना तेथील आरोग्य केंद्र, आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती अशी आहेत. त्यावरही दोन्ही आरोग्य सचिवांनी अगदी विनोदी पद्धतीने माहिती बैठकीत दिली. जिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन मशीन दीड ते दोन महिन्यांपासून बंद राहते. केवळ एक पार्ट मिळत नाही हे कारण आहे. कोरोना काळात सीटी स्कॅन मशीन बंद राहणे कितपत योग्य? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. तरंगता दवाखान्याचा उद्देश हा त्या दवाखान्यातील वैद्यकीय पथकाने एक वार ठरवून नर्मदा काठावरील प्रत्येकी एका गावात जाणे अपेक्षीत आहे. परंतु दवाखान्यातील पथक गावकऱ्यांना त्या त्या दिवासाला तरंगत्या दवाखान्यात बोलवत असते. शिवाय त्यातही नियमितपणा नाहीच. गाभा समितीची बैठक अनेक महिन्यांपासून झालेली नाही. सिकलसेल दवाखान्यांमध्ये सोयींच्या अडचणी आहेत. जिल्ह्यात कुपोणापेक्षा आता सिकलसेलची समस्या मोठी आहे. त्यामुळे या आजाराकडे गांर्भियाने पहाणे आवश्यक असतांना प्रधान सचिवांनी त्यालाही खो दिला.
दर वर्षाला कोट्यावधींचे अनुदान आरोग्य सेवेसाठी येते. त्या मानाने जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारली पाहिजे होती. परंतु ती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. प्रधान सचिवांनी यावर बोट ठेवले. पाहिजे तेवढे अनुदान देऊनही आरोग्याच्या समस्या व प्रश्न कायम का? असा प्रश्र्न त्यांनी उपस्थित केला. केवळ कोरोना काळात चांगले काम झाले म्हणून प्रशासन पाठ थोपटून घेत आहे. कोरोना आटोक्यात राहिला याला अनेक कारणे आहेत. त्याचा उहापोह मात्र होत नाही.
एकुणच आरोग्य सेवेविषयीच्या तक्रारी वर्षानुवर्षापासूनच्या आहेत. कोट्यावधींचा येणारा निधी खर्च कुठे होतो. कमिशनबेस कामकाज किती दिवस चालणार, सामान्य जनतेच्या आरोग्याशी आणखी किती दिवस खेळणार हे प्रश्न मात्र राज्यस्तरीय ३५ अधिकाऱ्यांच्या दौऱ्यानंतरही कायम आहेत व राहतील हे तेवढेच सत्य.