राज्यात सर्वात कमी ॲक्टिव्ह रुग्ण नंदुरबार जिल्ह्यात, एक हजारापेक्षा कमी ॲक्टिव्ह रुग्ण असलेला एकमेव जिल्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST2021-05-28T04:23:18+5:302021-05-28T04:23:18+5:30
नंदुरबार : राज्यात हवेतील ऑक्सिजन निर्मितीचा पहिला प्रकल्प साकारणारा नंदुरबार जिल्हा सध्या सर्वात कमी ॲक्टिव्ह रुग्ण असलेला जिल्हा म्हणून ...

राज्यात सर्वात कमी ॲक्टिव्ह रुग्ण नंदुरबार जिल्ह्यात, एक हजारापेक्षा कमी ॲक्टिव्ह रुग्ण असलेला एकमेव जिल्हा
नंदुरबार : राज्यात हवेतील ऑक्सिजन निर्मितीचा पहिला प्रकल्प साकारणारा नंदुरबार जिल्हा सध्या सर्वात कमी ॲक्टिव्ह रुग्ण असलेला जिल्हा म्हणून चर्चेत आला आहे. दुसरी लाट राज्यभर आटोक्यात येत असली तरी एक हजारापेक्षा कमी ॲक्टिव्ह रुग्ण सध्या तरी फक्त नंदुरबार जिल्ह्यात आहेत. तर रोज नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाणही प्रचंड नियंत्रणात आले आहे.
राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट सर्वत्र वेदनादायी ठरली. पहिल्या लाटेपेक्षा नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे रुग्णांना बेड न मिळण्याचे प्रमाण व मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण होते. हे वातावरण आता हळूहळू निवळू लागले असून रुग्ण संख्याही कमी होऊ लागली आहे. सद्य:स्थितीत राज्यात तीन लाख १४ हजार ३६८ ॲक्टिव्ह रुग्ण असून सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. या जिल्ह्यात ४५ हजार ६४८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ मुंबईत २७ हजार ८५५ तर ठाण्यात २३ हजार ७०२ रुग्ण आहेत. साताऱ्यातही १८ हजार ९०९ रुग्ण असून १० हजारांपेक्षा अधिक ॲक्टिव्ह रुग्ण असलेले राज्यात आजही १० जिल्हे आहेत. काही जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या कमी झाली असून गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या १२०० ते १५०० आहे. एक हजारापेक्षा कमी ॲक्टिव्ह रुग्ण फक्त नंदुरबार जिल्ह्यात असून या जिल्ह्यात २५ मेच्या आकडेवारीनुसार ९७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
विविध कारणांनी जिल्हा चर्चेत...
नंदुरबार जिल्हा गेल्या दोन महिन्यांपासून विविध कारणांनी चर्चेत आहे. विशेषत: येथील हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प, रुग्णालयात ऑक्सिजन बेडवरील रुग्णांना ऑक्सिजनचे नियंत्रण ठेवण्यासाठी राबविण्यात आलेली ऑक्सिजन सिस्टर योजना, जिल्ह्याने दुसऱ्या लाटेत सर्वप्रथम केलेले लॉकडाऊन, प्रत्येक रुग्णाला बेड मिळेल यासाठी केलेले प्रयत्न, संपर्क साखळी तोडण्यासाठी गावोगावी लावलेले स्वॅब तपासणी शिबिरे या विविध योजनांमुळे दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळविण्यात जिल्ह्याला यश आले आहे.
सर्वात कमी रुग्ण हिंगोली जिल्ह्यात
आजवरच्या एकूण रुग्णांमध्ये सर्वात कमी रुग्ण हिंगोली जिल्ह्यात आहेत. या जिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार ४६३ रुग्ण असून त्यात १५ हजार ८५ रुग्ण बरे झाले आहेत. याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातदेखील २३ हजार २२१ रुग्ण असून त्यापैकी १८ हजार ५१३ रुग्ण बरे झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात २७ हजार ८०८ तर वाशिम जिल्ह्यात ३८ हजार ४१६ रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ नंदुरबार जिल्ह्यात एकूण ३८ हजार ५५२ रुग्ण असून त्यापैकी ३६ हजार ७८१ रुग्ण बरे झाले आहेत.
नंदुरबारमधील मृत्यू मात्र चिंताजनक
जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या व सध्या राज्यात सर्वात कमी ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ही बाब समाधानकारक असली तरी जिल्ह्यात कोरोनामुळे होणारे मृत्यू ही चिंताजनक बाब आहे. एकूण ७९३ मृत्यू झाले असून त्याचे प्रमाण १.९१ टक्के आहे. सध्या देखील गेल्या पंधरवड्यापासून नवीन रुग्ण संख्या दोन आकडी येत असली तरी मृत्यूचे प्रमाण मात्र रोजचे वाढले आहे.