नंदुरबार : पिण्याच्या पाण्याचे १३६ स्त्रोत दूषित
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 10:12 IST2018-04-16T10:12:49+5:302018-04-16T10:12:49+5:30
नंदुरबार जिल्हा : जोखमीच्या २२ गावांमध्ये पर्यायी स्त्रोतांबाबत उदासीनता

नंदुरबार : पिण्याच्या पाण्याचे १३६ स्त्रोत दूषित
मनोज शेलार
नंदुरबार : पाणी सुरक्षितता आराखड्यांतर्गत जिल्ह्यातील सात हजार ६०४ स्त्रोतांची माहिती संकलित झाली आहे. त्यापैकी १३६ स्त्रोत दूषित आढळून आले आहेत. शिवाय २२ गावेदेखील तीव्र जोखमीची घोषित करण्यात आली आहेत. या गावांना पर्यायी उपाययोजनेबाबत मात्र फारसे गांभीर्य नसल्याची स्थिती आहे. उन्हाळ्यात तर अशा गावांमधील ग्रामस्थांना दूषित स्त्रोतांशिवाय पर्यायच नसल्याची स्थिती आहे.
शासनाने राज्यातील निवडक जिल्ह्यांचा जिल्हा पाणी सुरक्षितता कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात नंदुरबार जिल्ह्याचादेखील समावेश करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या गुणवत्ता शाखेमार्फत जिल्ह्याचा गाव, स्त्रोतनिहाय पाणी सुरक्षितता कृती आराखडा तयार केला आहे. हा आराखडा तयार करताना पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतासंबंधी मागील तीन वर्षातील लाल कार्ड, हिरवे कार्डची संख्या. गावांची शौचालय व्याप्ती, शहरालगतची गावे अथवा मोठ्या ग्रामपंचायती, स्त्रोतनिहाय मागील वर्षात केलेल्या उपाययोजना, गावांची लोकसंख्या, एकूण कुटुंबसंख्या, गावातील साक्षर व निरक्षर संख्या या माहितीसह पाण्याच्या अनुजैविक व रासायनिक तपासणीत दूषित आढळून आलेल्या स्त्रोतांची माहिती एकत्रित करण्यात आली आहे. एकूण ९४८ गावातील सात हजार ६०४ सार्वजनिक स्त्रोतांचा त्यात समावेश आहे.
आराखड्यानुसार, पाणी नमुना तपासणीत एकूण १३६ जलस्त्रोत दूषित आढळून आले. त्यात हार्डनेस, टीडीएस व आयर्न आढळून आले. त्यापैकी २२ गावे ही तीव्र जोखमीची म्हणून बाजूला काढण्यात आली आहेत. या ठिकाणी पर्यायी जलस्त्रोत निर्माण करणे किंवा इतर उपाययोजना करण्याचे सुचविण्यात आले होते. या गावांमध्ये शहादा तालुक्यातील मनरद, वडाळी, कु-हावदतर्फे सारंगखेडा, लोणखेडा, मलोणी, प्रकाशा, सोनवदतर्फे सारंगखेडा, कळंबू व वडगाव. तळोदा तालुक्यातील धनपूर, नवागाव, मोहिदा, नर्मदानगर.
अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर बुद्रूक, वडफळी. नंदुरबार तालुक्यातील धानोरा. नवापूर तालुक्यातील बिलदा, चिंचपाडा, घोगलपाडा, शेजवे, तारपाडा, विसरवाडी यांचा समावेश आहे. तेथील उपायोजनांबाबत मात्र फारशी प्रगती नसल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील जलस्त्रोतांची तपासणी करताना त्यांची रासायनिक घटकांच्या दृष्टीनेही तपासणी करण्यात आली. त्यात सुदैवाने ‘फ्लोराईड’ व ‘नायट्रेट’ बाधित एकही स्त्रोत आढळून आले नसल्याचे स्पष्ट झाले. परंतु पाण्यात हार्डनेस असलेली ८९, टीडीएस असलेली १५ तर आयर्न असलेले ३२ स्त्रोत आढळून आले आहेत. सर्वाधिक बाधित स्त्रोतांची संख्या ही शहादा व नवापूर तालुक्यातील आहे. अशा ठिकाणी पर्यायी उपाययोजना करण्याबाबत सबंधित विभागांचा प्रयत्न सुरू असले तरी फारसे समाधानकारक चित्र नसल्याची स्थिती आहे.