स्मृती जतन करण्यासाठी स्मारकाचा विकास व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 11:33 IST2020-03-02T11:33:48+5:302020-03-02T11:33:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रावलापाणी येथे इंग्रजांच्या गोळीबारात धारातिर्थ पडलेल्या आदिवासी क्रांतीकारकांच्या स्मारकाचा विकास लवकर व्हावा व या ...

The monument should be developed to preserve the memory | स्मृती जतन करण्यासाठी स्मारकाचा विकास व्हावा

स्मृती जतन करण्यासाठी स्मारकाचा विकास व्हावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : रावलापाणी येथे इंग्रजांच्या गोळीबारात धारातिर्थ पडलेल्या आदिवासी क्रांतीकारकांच्या स्मारकाचा विकास लवकर व्हावा व या ऐतिहासिक स्थळाला नावारुपाला आणावे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. येथील खडकावरील गोळीबाराच्या खुणा जपल्या जाव्यात व स्वातंत्र्य संग्रामाचे मोठे स्मारक व्हावे. त्यातून समाजाला प्रेरणा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सातपुड्यातील दुर्गम भागात असलेल्या रावलापाणी येथे २ मार्च रोजी १९४३ रोजी इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात १५ क्रांतीकारक शहीद झाले होते. या स्मारकाचा विकास व्हावा यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू आहेत. परंतु अपेक्षीत दखल घेतली जात नाही. या स्मारकाचा विकास झाल्यास हे एक चांगले पर्यटनस्थळ देखील होऊ शकणार आहे.
या घटनेचा इतिहास मोठा प्रेरणादायी आहे. १९४२ च्या चलेजाव चळवळीमुळे देश पेटून उठला होता.
त्याआधी पश्चिम खान्देश जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी आप चळवळीचे संत श्री रामदास महाराज यांच्यावर १० जून १९४१ रोजी पहिली बंदी आणली. २४ आॅक्टोबर १९४१ ला जावली (गंगठा संस्थान) येथे दंगा झाला. आप धर्मियांवर अत्याचार झालेत. जाळपोळ झाली. यावेळी आरतीवर बंदीची मागणी लावून धरण्यात आली. ३० आॅक्टोबर १९४१ रोजी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी मोरवड येथे कलम १४४ लावून आरतीवर सक्तीने बंदी आणली. नंतरच्या काळात अर्थात २३ एप्रिल १९४२ रोजी संत रामदास महाराज व इतर ३० अनुयायी यांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले गेले.
तत्कालीन पश्चिम खान्देश जिल्ह्यातील आदिवासी, गोर-गरिबांचा या चळवळीत प्रत्यक्ष सहभाग व्हावा म्हणून तत्कालीन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब ठकार यांनी आप चळवळीचे प्रमुख संत श्री. रामदास महाराज यांना दोन वर्षाच्या हद्दपारीची शिक्षा भोगत असतांना प्रत्यक्ष आवाहन केले.
आपली हद्दपारीची मुदत संपलेली नसतांना चलेजाव चळवळीला आपल्या संघटन शक्तीतून मोठे बळ देण्याच्या हेतूने, क्रांतीकारकांच्या पाठीशी भक्कमपणे राहण्यासाठी वाटचाल करणाºया आप समुदायाला बन, ता.तळोदा येथून ५ किलोमिटर अंतरावर लक्ष केले गेले. ४ मार्च रोजी महाशिवरात्रला आरतीला पोहचण्यासाठी हा जत्था निघाला होता. २ मार्च रोजी निझरा नदीच्या पात्रात हजारोच्या संख्येने मुक्कामाला असणाºया समाजावर बेछूट गोळीबार केला गेला. कॅप्टन ड्युमन याच्या आदेशावरून गोळीबार झाला त्यात १५ जण शहीद झाले. परंतु कोण शहीद झाले त्यांची नावे उपलब्ध नाहीत.
गोळीबार एवढा अमानुष होता की ८० वर्षापूर्वी झालेल्या गोळीबाराच्या खूना आजही दगडांवर स्पष्टपणे दिसून येतात. यासंदर्भात तळोदा पोलिसात त्यावेळी दोन गुन्हे दाखल झाले. ३०० पेक्षा अधीक जणांना आरोपी केले गेले.
या सर्वांचे नेतृत्व संत रामदास महाराज करीत होते. अशा या ऐतिहासिक स्थळाचा विकासासाठी सर्व घटकांकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे.

Web Title: The monument should be developed to preserve the memory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.