सासरच्यांनी केलेल्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
By भूषण.विजय.रामराजे | Updated: October 27, 2023 15:30 IST2023-10-27T15:30:27+5:302023-10-27T15:30:33+5:30
घटनेची माहिती मिळाल्यानंतर मयत लक्ष्मी यांच्या माहेरचे सुरत येथून दाखल झाले होते.

सासरच्यांनी केलेल्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
नंदुरबार : शहरातील जयहिंद काॅलनीतील रहिवासी असलेल्या विवाहितेने २४ ऑक्टोबर रोजी गळफास घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी विवाहितेला सासरच्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. लक्ष्मी योगेश जाधव (२४) रा. जयहिंद कॉलनी असे गळफास घेत आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे.
लक्ष्मी यांचा विवाह जयहिंद कॉलनीतील योगेश कन्हैय्या जाधव (२८) याच्यासोबत झाला होता. विवाह पश्चात काही पती योगेश हा लक्ष्मी यांच्या चारित्र्यावर संशय घेत छळ करत होता. यातून लक्ष्मी यांच्या पोटातील बाळ आपले नसल्याचे सांगून शारीरिक व मानसिक त्रास देत होता. पतीसोबत सासू-सासरे व दीराकडून ही छळ होत असल्याने विवाहितेने २४ ऑगस्ट रोजी दुपारी जयहिंद कॉलनीतील सासरी गळफास घेत आत्महत्या केली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मयत लक्ष्मी यांच्या माहेरचे सुरत येथून दाखल झाले होते.
त्यांच्याकडून मुलीचा छळ करण्यात येत असल्याचे पोलिसात स्पष्ट करण्यात आले होते. यातून मयत विवाहिता लक्ष्मी यांची आई आशाबाई विजय आविळे यांनी नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित पती योगेश जाधव (२८), सासरे कन्हैय्या विश्वनाथ जाधव (५९), सासू सोनीबाई जाधव (५०) आणि दीर अजय कन्हैय्या जाधव (२५) सर्व रा. जयहिंद कॉलनी यांच्याविरोधात विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक माधुरी कंखरे करत आहेत.