लोकमान्य टिळक व ग्रंथलेखन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:25 IST2021-07-25T04:25:42+5:302021-07-25T04:25:42+5:30

लोकमान्यांचे हयातीतच वरील तीन ग्रंथ प्रकाशित झालेत आणि त्यांचे निधनानंतर १९२५ मध्ये त्यांच्या चिरंजिवांनी ‘वेदिक क्रॉनॉलजी’ आणि ‘वेदांग ज्योतिष’ ...

Lokmanya Tilak and bibliography | लोकमान्य टिळक व ग्रंथलेखन

लोकमान्य टिळक व ग्रंथलेखन

लोकमान्यांचे हयातीतच वरील तीन ग्रंथ प्रकाशित झालेत आणि त्यांचे निधनानंतर १९२५ मध्ये त्यांच्या चिरंजिवांनी ‘वेदिक क्रॉनॉलजी’ आणि ‘वेदांग ज्योतिष’ हे इंग्रजी भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध केले.

ऑर्क्टिक होम, ओरायन व वेदिक क्रॉनाॅलजी हे ग्रंथ म्हणजे टिळकांचे ‘वेदकालीन संशोधन’ म्हणता येतील. हे वेद संशोधन इंग्रजी भाषेतून केले असून, ते पूर्णत: संशोधनाच्या दृष्टीने लिहलेले आहेत. हे लेखन करण्यामागील टिळकांचा जो हेतू होता तो म्हणजे पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संशोधकांनी या लेखनाचा काळजीपूर्वक विचार करावा. तर ‘गीता रहस्य’ हा ग्रंथ मराठीत आहे. या ग्रंथाची अन्य भाषांपासून ही भाषांतरे झालेली आहेत. वेद-संशोधन हे विद्‌वत जनांसाठी तर गीता -रहस्य हे सामान्य जनसमुदायासाठी लिहिले गेले आहे.

लोकमान्य हे वेदांती होते. वेदांताच्या अध्ययनामुळे वाचनांचे त्यांनी जे ध्येय ठरविले त्याचेच एक अंग म्हणजे त्यांचे राजकीय कार्य होय. केसरीच्या (१९०६) च्या एका अंकात त्यांनी लिहले आहे - ‘वेदांत हे परोपकारांचे मोठे माप व देशाभिमान हे धाकटे माप, एवढाच दोहाेंमध्ये फरक होय’

जीवित ध्येय व राजकारण यांचा अन्योन्य संबंधही त्यांनी स्पष्ट केला आहे. वेदांताचे ध्येय आणि राष्ट्रहित यांचा समन्वय कसा करावा हे मात्र समजून घेणे आवश्यक होय. यासाठी आत्मसंयम व स्वार्थत्याग याचा समन्वय कसा करावा हे मात्र समजून घेणे आवश्यक होय यासाठी आत्मसंयम व स्वार्थत्याग लागतो. टिळकांचे यासंबंधीचे म्हणणे असे की, मनुष्य जातीवर दया तसेच परमेश्वरापुढे सर्व मानव समान आहेत, अशी बुद्धी व परोपकारी भावना वेदांती व राष्ट्रीय अशा दाेन्ही ध्येयांना व्यापून टाकते.

ओरायन व आर्क्टिक्ट होम इन दि वेदाज ह्या ग्रंथांनी वैदिक संस्कृतीचा उगम केव्हापासून आहे हे स्पष्ट केले आहे, म्हणून ‘वे-संशोधन’ हा टिळकांचा फावल्या वेळेचा छंद नव्हता, त्यासाठी आर्क्टिक्ट होमच्या प्रस्तावनेत त्यांनी जो विचार मांडला तो बघणे क्रमप्राप्त आहे, ते म्हणतात- १८९३ मध्ये माझे ‘ओरायन’ प्रसिद्ध झाले, त्यावेळी वेदाच्या प्राचीनत्वाचे संशोधन मी एवढ्या थराला नेऊ शकेन असे मला वाटले नाही, परंतु अडचणी व संकटे यामधूनच हे काम करण्याची शक्ती मला परमेश्वराच्या कृपेने लाभली, म्हणून त्याचे स्मरण करून मी प्रस्तावनापूर्ण करतो, ‘ओरायन’ या संशोधनात्मक ग्रंथामुळेच टिळकांच्या बुद्धिमत्तेचा परिचय पाश्चात्य संशोधकांना झाला. प्रो ब्लुमफील्ड प्रो.याकोबी, मी बार्थ, प्रो मॅक्समुलर या पाश्चात्य विद्धानांनी टिळकांचे मते मान्य केलीत. अध्ययन व संशोधन हे लोकमान्य टिळकांच्या जीवनाचे वैशिष्ट म्हणावे लागेल. पारतंत्र्य व देशाची दुर्दशा नसती तर त्यांचे हातून अन्यही संशोधनापर लेखन झाले असते.

ग्रंथलेखन हे लोकमान्य टिळकांच्या जीवनातील कर्तव्यक्षेत्र ठरते. या कतृत्व क्षेत्रात शुद्ध राजकारणाला अनाठायी महत्त्व मिळाले हा कदाचित पारतंत्र्याचा परिणाम असावा, पण स्वातंत्र्यातदेखील लोक कल्याणासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न-कार्य-खटाटोप करावेच लागतात.

महात्मा गांधीजींचे चरित्र अवंतिबाई गोखले यांनी लिहिले आहे. या चरित्रास टिळकांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यात ‘धर्म’ या शब्दाचे स्पष्टीकरण करताना टिळकांनी म्हटले आहे - ‘पारतंत्र्यनिरपेक्ष अशा सर्वसामान्य कर्तव्यबुद्धीलाच धर्म मानावे’ टिळकांनी आपल्या आयुष्यात जे कार्य केले त्याचा संबंध राष्ट्र संवर्धनाशी होता हे मात्र निश्चित!

ग्रंथाची व्याख्या करताना रस्किन यांनी म्हटले आहे - ‘आपल्या एकंदर वैचारिक जीवनाचा भावी पिढ्यांसाठी अखेरचा निष्कर्षाच्या रूपाने काढून ठेवलेला वारसा म्हणजे ग्रंथ’ या व्याख्येत लोकमान्य टिळकांचे जे दोन वेद संशोधनात्मक ग्रंथ आहेत ते बसू शकतील काय?

लाेकमान्य टिळकांचा तिसरा ग्रंथराज म्हणजे ‘गीता रहस्य’ विसाव्या शतकातील तीन महापुरुष एक लोकमान्य टिळक, दाेन आचार्य विनोबा भावे व तिसरे महात्मा गांधी- यांनी श्रीमद भगवदगीतेचे मंथन करून अनुक्रमे गीतारहस्य, गीताई व अनासक्तीयोग अशी ग्रंथसंपदा लिहिली. आज या तीन ही नवनीतांची तुलना करण्याची गरज नाही. टिळकांच्या ‘गीता रहस्य’ संबंधी म्हणावयाचे झाल्यास टिळकांचा हा ग्रंथ म्हणजे ‘ग्रंथ-राज’च होय.

‘गीता रहस्य’ म्हणजे टिळकांच्या विचारांचा परिपाक होय. जीवन विद्येची गुरुकिल्ली शोधण्यासाठी, लोकमान्यांनी जे वाचन-मनन चिंतनांनी जे अनुभव प्राप्त केले. त्या सर्वांचा निष्कर्ष या ग्रंथात मिळेल. १८७२ मध्ये वडिलांच्या मृत्युशय्येवर त्यांनी गीता वाचून दाखविली, तेव्हापासून या ग्रंथातील विचारांचा उगम आहे, असे स्वत: टिळकांनीच गीता-रहस्याच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. गीता-रहस्याचे सार स्पष्ट करताना टिळक म्हणाले होते-विचारांती माझे असे मत झाले आहे की, जगताची सेवा म्हणजे परमेश्वराचीच सेवा व ती करणे हाच मुक्तीचा स्पष्ट मार्ग होय आणि मार्ग जगात राहूनच आचरता येतो, त्याला जग साेडून दूर जाण्याची आवश्यकता नाही. ‘गीता रहस्य’ या ग्रंथात कर्मजिज्ञासा, सिद्धावस्था, व्यवहार आणि उपसंहार या तीन प्रकरणांमध्ये नीतिशास्त्राचे विवेचन झाले आहे. जगातील लोकसेवेचे कार्य हे परमेश्वरी कार्य होय, निर्मळ बुद्धीने परमेश्वरावर विश्वास ठेवून मनाला आवेग उत्पन्न न होवू देता कार्ये करीत राहण्याने कार्यरत जीवनाची उन्नती होते, असे टिळकांनी स्वानुभवाने म्हटले आहे.

लोकमान्य टिळक यांचे ग्रंथ-कतृत्वात ‘गीता-रहस्य’ या विषयाचा विस्तार इतका व्यापक आहे की एका संक्षिप्त लेखात त्याचे विवेचन करणे शक्य नाही. ग. वि. केतकर यांनी या संदर्भात जे मत व्यक्त केले आहे ते उद्धृत करण्याचा मोह होतो. ते म्हणतात. ‘हिंदुस्थानातील प्राचीन परंपरागत तत्त्वज्ञान व इंग्रजी शिक्षणाबरोबर आलेले पाश्चात्य तत्त्वज्ञान यांचा गेल्या पिढीतील एक प्रचंड बुद्धिमान व कतृत्वशाली थोर पुरुषाच्या मनामध्ये संयोग होऊन व तो अनुभवाच्या आघातांनी घडविला जाऊन ‘गीता - रहस्य’ रूपाने प्रकट झाला आहे’ म्हणूनच मानवी जीवनाच्या मूलभूत प्रश्नासंबंधीच्या विचारांचा परिपाक असा हा ग्रंथ पिढ्यान-पिढ्या मार्गदर्शक ठरेल.’

ग्रंथांच्या माध्यमातून जाणीव जागृत होत असेल तरच न्यायाला बळ मिळेल ‘शाश्वत राज्य’ असा शब्द प्रयोग करणे चूक ठरते पण ‘शाश्वत ग्रंथ’ हा शब्द प्रयोग सातत्याने राहणार, कारण ग्रंथ व ग्रंथकार चिरंजीवी राहतात. म्हणूनच लोकमान्य टिळक यांचे सारे वाङ्मय हे आजही चैतन्यदायी आहे कारण ते केवळ साहित्य नसून ती एका झुंझार याेद्ध्याची कठोर जीवनसाधना हाेय.

- प्रा. डॉ. पीतांबर सरोदे,

कार्यवाह, लोकमान्य टिळक जिल्हा वाचनालय, नंदुरबार

Web Title: Lokmanya Tilak and bibliography

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.