मुबलक अन्नधान्यासाठी कणीमाता पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 12:21 IST2019-11-24T12:20:58+5:302019-11-24T12:21:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अस्तंबा ता.धडगाव येथे दिवाळीच्या कालावधीत साजरी होणा:या ‘डोगोअ दिवाली’ नंतर सातपुडय़ातील आदिवासींमध्ये नवीन अन्नाच्या ...

Kanimata puja for abundant food | मुबलक अन्नधान्यासाठी कणीमाता पूजन

मुबलक अन्नधान्यासाठी कणीमाता पूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अस्तंबा ता.धडगाव येथे दिवाळीच्या कालावधीत साजरी होणा:या ‘डोगोअ दिवाली’ नंतर सातपुडय़ातील आदिवासींमध्ये नवीन अन्नाच्या पूजनाला सुरुवात झाली आहे. या पूजनाला तेथील भाषेत आठीवटी म्हटले जात असून कणीमातेने सर्व बांधवांना मुबलक अन्न-धान्य द्यावे, अशी प्रार्थना करण्यात येत आहे. 
सातपुडय़ात भौगोलीक दृष्टय़ा प्रतिकुल परिस्थिती असल्यामुळे नगदी पिके घेता येत नसली तरी या भागात प्रामुख्याने अन्नधान्ययुक्त पिकांचीच लागवड करण्यात येते. या धान्याची पिक लागवडीपासून सेवन होईर्पयत वेगवेगळ्या टप्प्यावर त्याची पूजा करण्यात येते. त्यात नवाय व आठीवटी या दोन महत्वाच्या पूजा आहेत.  नवाय ही पूजा दसरा साजरी होण्यापूर्वीच  केली जाते. तर अस्तंबा येथील ‘डोगोअ दिवाली’ साजरी झाल्यानंतर आठीवटीच्या पूजेला सुरुवात होते. अस्तंब्याच्या दिवाळीसाठी प्रत्येक घरातील प्रमुख व्यक्ती जात असतो. तेथे देखील मुबलक अन्नधान्यासाठी अन्नाचे कण सोबत घेऊन जात असते. अस्तब्याच्या शिखरावरुन उतरल्यानंतर आपापल्या सवळीनुसार हे बांधव आठीवटी या पूजेसाठी कुटुंबात तयारी सुरू करतात. गावातील सर्व मंडळींच्या सोयीनुसार ही पूजाविधी होते. 
ही पूजा रात्रीच्या वेळेलाच केली जात असून एका घरातील नवीन अन्न पूजेसाठी प्रथम गावातील सात, नऊ किंवा 11 व्यक्तींना वाहत्या नदीच्या निर्मळ पाण्यात रात्रीच्या वेळेस दुधाने विधीवत आंघोळ करावी लागले. शिवाय घरातील प्रमुख महिला देखील दुधानेच आंघोळ करीत  असते. नदीवरुन येतानाच तांब्याभर नदीचे पाणी सोबत आणावे लागते. शिवाय बेल झाडाच्या लहान फांद्याही आणाव्या लागतात. ही  पूजा परंपरेनुसार चुलीवर अथवा उखळावर केली जात आहे.  पूजेला सुरुवात करण्यापूर्वी शेणाने पुजेची जागा सारवली जाते, पुजेसाठी नवीन धान्य, कणसे, बेलपाने, विशिष्ट पद्धतीन बनवलेले लहान मडके (बोत), पेय पदार्थाच्या प्रसादासाठी दुधी भोपळ्यापासून निर्मित भांडे (डोवी)  यासह विविध साहित्य लागत आहे. या पूजेसाठी दुधाने आंघोळ करणा:या व्यक्तीला पूजा होईर्पयत काही व्रत (पालनी) पाळावी लागत आहे. विधीवत पूजेसाठी आंघोळ करणा:या प्रत्येक व्यक्तीला पूजेसाठी बसविले जात  आहे. 
पूजा करताना ज्वारीचे दाणे सोडली जात असून त्यात घरातील सर्व कोठय़ा, सर्व भांडी, उखळ, जातं यासह अन्य ¨ठकाणी देखील धान्याचे मुबलक प्रमाण राहावे यासाठी एकप्रकारची प्रार्थनाच केली जाते. या धान्यातून कुटुंबातील सर्व सदस्यांसह कार्यक्रमाला उपस्थित राहणा:या प्रत्येक व्यक्तीलाही धन लाभावे, अशीही प्रार्थना केली जात आहे. पूजा संपल्यानंतर संपूर्ण गाव मंडळींच्या उपस्थितीत विविध प्रसादाचा कार्यक्रम होतो. या मंडळींना पंगत देण्याची प्रथा असून यासाठी त्या-त्या घरातून पूर्वनियोजन करण्यात येत आहे. याच पंगतीत पूजा होणा:या कुटुंबातील सर्व सदस्यही आस्वाद घेत आहे.


बेल झाडात आरोग्यवर्धक अनेक गुण दडलेले आहेत. पोटदुखीपासून अनेक गंभीर आजारांवर बेलपाने गुणकारी असल्याचे विज्ञानाच्या आधारावर म्हटले जाते आहे. परंतु आदिवासींमध्ये कूठल्याही पूजाविधीसाठी बेलपानांचीच पहिले नैवेद्य (तेथील भाषेतील पाती) दिले जात आहे. त्यामुळे विज्ञान - तंत्रज्ञानाचा विकास होण्यापूर्वीच आदिवासींमध्ये या पानांना महत्व दिले जात असावे. धडगाव व मोलगी परिसरात होणारी आठीवटी (कणीमाता) पूजा ही देवानेच सुरू केलेली पूजा असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे बेलपानांमधील गुणांचा शोध देखी आदिवासींनीच आधी लावला असावा. असे म्हटले जात आहे. 
 

Web Title: Kanimata puja for abundant food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.