किलोमांजारो शिखरावर गुंजले भारतीय संविधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:07 IST2021-02-05T08:07:16+5:302021-02-05T08:07:16+5:30

नंदुरबार - दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च किलोमांजारो शिखरावर चढाई करत सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील अनिल वसावे या गिर्यारोहकाने प्रजासत्ताकदिनी भारतीय संविधानाचे ...

The Indian Constitution resounded at the summit of Kilomanjaro | किलोमांजारो शिखरावर गुंजले भारतीय संविधान

किलोमांजारो शिखरावर गुंजले भारतीय संविधान

नंदुरबार - दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च किलोमांजारो शिखरावर चढाई करत सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील अनिल वसावे या गिर्यारोहकाने प्रजासत्ताकदिनी भारतीय संविधानाचे वाचन करून तिरंगा फडकविला. सुमारे २० हजार फुट उंचीचे अतिशय अवघड शिखर सर करून नवा इतिहास घडविणारा अनिल वसावे हा पहिला आदिवासी तरुण ठरला आहे.

एक्सप्लोरर ग्रुपतर्फे देशातील १० तरुणांच्या पथकाची दक्षिण आफ्रिकेतील किलोमांजारो हे शिखर सर करण्यासाठी निवड करण्यात आली होती. त्यात सातपुड्यातील अनिल वसावे या युवकाचा समावेश होता. दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया या देशात हे शिखर असून, त्याची उंची समुद्र सपाटीपासून १९ हजार ३४१ फूट आहे. अतिशय प्रतिकूल वातावरण तेथील तापमान ० अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे. घोंगावणारा जोराचा वारा आणि उभा चढाव तसेच सातत्याने होणारी बर्फवृष्टी यामुळे हे शिखर सर करणे म्हणजे गिर्यारोहकांसाठी एक आव्हानच आहे. त्यामुळे एक्सप्लोरर ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रसिद्ध गिर्यारोहक आनंद बनसोडे यांनी हे शिखर सर करण्यासाठी यंदा निश्चित केले होते. गेल्या २२ जानेवारीला त्यासाठी शिखराच्या पायथ्यालगत असलेल्या मोशीपासून सुरुवात केली. २६ जानेवारीला सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी अनिल वसावे यांनी सर्वप्रथम शिखर गाठून भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचन केली. त्यानंतर तिरंगा फडकाविला. हे शिखर सर करण्यासाठी अनिल वसावे व पथकाने मोठे परिश्रम घेतले व त्यासाठी सराव केला होता.

अनिल वसावे हा सातपुड्यातील बालाघाट, ता. अक्कलकुवा येथील रहिवासी आहे. त्याच्या घरापर्यंत अद्याप रस्ता नाही. घराला लागूनच सातपुड्याचे डोंगर असून, या डोंगरावर चढउतर करीत त्याने गिर्यारोहणाचा सराव केला. त्यातूनच महाराष्ट्रातील कळसूबाई, अजिंक्यतारा, हरिश्चंद्र गड आदी शिखर सर करीत त्याने महाराष्ट्राबाहेरील शिखरांवर चढाव केली. आता सातासमुद्रापार दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर सर करून त्याने एक नवा इतिहास रचला आहे.

कोट :

किलोमांजारो हे शिखर सर करणे आमच्यासाठी आव्हान होते. प्रत्येक पावलावर एक सहास होते. मात्र ते पूर्ण करता आले त्याचा खूप आनंद आहे. त्यासाठी मला आदिवासी विकास विभाग, आदिवासी शिक्षक संघ, जैन इरिगेशन व पत्रकारांनी दिलेली साथ मोलाची आहे. सर्वांच्या सहकार्यानेच आपण हे स्वप्न पूर्ण करू शकलो. आता एव्हरेस्टसाठी तयारी करायची आहे. - अनिल वसावे.

आपल्या संघाने जे यश संपादन केले त्याचा खूप अभिमान आहे. दक्षिण आफ्रिकेतील शिखरावर भारतीय संविधानाचे वाचन ही अभिमानास्पद कामगिरी आहे. अतिशय प्रतिकूल वातावरणात या पथकाने शिखरावर चढाई करून जी कामगिरी केली त्याला खरोखरच कुठलीही तोड नाही. - आनंद बनसोडे, सीईओ, ३६० एक्सप्लोरर.

Web Title: The Indian Constitution resounded at the summit of Kilomanjaro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.