मास्कचा वापर वाढल्याने क्षयरोगाचीही भीती झाली कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:32 IST2021-05-11T04:32:19+5:302021-05-11T04:32:19+5:30
जिल्ह्यात २०१७ या वर्षात ३ हजार ३४० जणांना क्षयरोग झाला होता. २०१८ या वर्षात ३ हजार १७२ रुग्ण, ...

मास्कचा वापर वाढल्याने क्षयरोगाचीही भीती झाली कमी
जिल्ह्यात २०१७ या वर्षात ३ हजार ३४० जणांना क्षयरोग झाला होता. २०१८ या वर्षात ३ हजार १७२ रुग्ण, २०१९ या वर्षात ३ हजार २५९, तर २०२० या वर्षात २ हजार ९६ जणांना क्षयरोग असल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले होते. १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ या चालू वर्षात विभागाने केलेल्या चाचण्यांनुसार ४६० जणांना क्षयरोग असल्याची माहिती दिली गेली होती. २०१७ पासून रुग्णांना वेळेवर दिल्या जाणाऱ्या औषधी आणि योग्य उपचार यामुळे रुग्णांच्या संख्येत घट झाली असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, याबाबत जिल्हा क्षयरोग अधिकारी डाॅ. अभिजित गोल्हार यांना संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, कोरोना हा आजार श्वसनाचा आजार आहे. त्याचा विषाणू हा खोकलल्यास किंवा शिंकल्यास पसरून त्याचा संसर्ग होतो. क्षयरोग किंवा टीबी अर्थात ट्यूबरक्यूलोसिस हा आजार ही कोरोनाप्रमाणे संसर्गजन्य आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर पूर्वीपासून केला जातो. कोरोनामुळे नागरिकांमध्ये मास्कचा वापर वाढल्याने क्षयरोगाच्या संसर्गाचा धोकाही कमी झाला आहे. सोबत लाॅकडाऊनमुळे गर्दीही कमी असल्याने ही संख्या आणखी आटोक्यात आली आहे.
एकीकडे मास्कमुळे संसर्गजन्य आजारांचा धोका कमी झाला असताना क्षयरोगींचा मृत्यूदरही कमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात २०२०-२०२१ या वर्षात क्षयरोगामुळे ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी मृत्यूचा हा दर पाच टक्के असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे. क्षयरोगाची लागण झालेल्या १०० पैकी पाच रुग्णांचा मृत्यू होत असल्याची माहिती, परंतु गेल्या एक वर्षात ही टक्केवारी एक टक्के असल्याचे स्पष्ट होत आहे.