दुपारनंतर कधीही करा मूर्तीचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 13:06 IST2020-08-31T13:06:16+5:302020-08-31T13:06:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अनंत चर्तुदर्शीला होणारे दुपारी १२ नंतर आरती करुन चार वाजेनंतर विसर्जन करण्याची योग्य वेळ ...

दुपारनंतर कधीही करा मूर्तीचे विसर्जन
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अनंत चर्तुदर्शीला होणारे दुपारी १२ नंतर आरती करुन चार वाजेनंतर विसर्जन करण्याची योग्य वेळ असल्याचे मत ज्येष्ठ पुरोहित मधुकर जोशी यांनी मांडले आहे़ यंदा साधेपणाने होणारा गणेशोत्सव आणि घरीच बाप्पाचे विसर्जन या संदर्भात ‘पौरोहित्य’ करणाऱ्या ब्रह्मवृंदाचे मत जाणून घेतले होते़
शहरासह जिल्ह्यात साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे़ यात पाचव्या, सहाव्या, सातव्या आणि नवव्या दिवशी अनेक ठिकाणी गणपती बाप्पाचे विसर्जन पूूर्ण करण्यात आले आहे़ आता फक्त काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे़ प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार मंडळांकडून मिरवणूक न काढता विसर्जन होणार आहे़ पालिकांकडून घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे़ यात घरगुती बाप्पाचे घरीच विसर्जन करावे अशा सूचना आहेत़ या पार्श्वभूमीवर शहरातील पुरोहितांसोबत चर्चा केली असता, मूर्तीचे वाहत्या पाण्यात साधेपणाने विसर्जन योग्य असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले़
दरम्यान अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत याबाबत संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, वीस वषार्पूर्वी गणपती मूर्ती दान आणि निर्माल्य दान करा ही मोहीम सुरू केली. सण-समारंभ आणि उत्सवांना पर्यावरणपूरक रूप देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या मोहिमेला सुरुवातीला विरोधाला सामोरे जावे लागले. पण हळूहळू या मोहिमेची उपयुक्तता समाजाला पटत गेली़
विसर्जित मूर्ती दान आणि निर्माल्य संकलन हे समाजाने मोठ्या प्रमाणावर स्वीकारले आहे. गणपतीची मूर्ती पार्थिवाची म्हणजे पृथ्वी पासून अर्थात मातीची असावी असा धर्मशास्त्राचा संकेत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काही वर्षांपूर्वी तसा आदेश दिला आहे. त्याची अंमलबजावणी होत आहे़ अशाच स्वरूपाचा एक आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देखील दिला आहे़ आज महानगरपालिका, नगरपालिका या क्षेत्रामध्ये सकारात्मक भूमिका याचमुळे बजावताना दिसतात. अनेक ठिकाणी निर्माल्य संकलन व विसर्जित मूर्ती संकलन केंद्रे नगरपालिकांनी सुरू केलेली आहेत. हा बदल उल्लेखनीय असल्याचे मत त्यांच्याकडून मांडण्यात आले़
गणेशमूर्ती दान ही मोहीम आज शासनाच्या धोरणाचा भाग बनली आहे. याचा संघटना म्हणून आनंद आणि समाधानाची भावना आहे. राज्यात एक कोटी कुटुंबात गणरायाची प्रतिष्ठापना करतात़ सक्तीची वर्गणी वसुली, गुलालाची उधळण, थर्माकोलचा वापर, कानठळ्या बसवणारा आवाज या अशा अनेक बाबी कोरोनाच्या प्रभावाने आपोआप टळल्या आहेत. पण याबाबतही प्रबोधन करण्याची आजही गरज जाणवते.
-विनायक सावळे, सरचिटणीस, महाराष्ट्र, अंनिस
घरीच गणेश मूर्तींचे विसर्जन करणे शास्त्रसंमत नाही़ स्थापन केलेल्या मूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन केले पाहिजे़ यातून माती पाण्यात विरघळून ती प्रवाहित होते़ यातून पाण्याला वरदान प्राप्त होते़ घरीच किंवा थांबलेल्या पाण्यात गणपती मूर्ती विसर्जन केल्यास ते पायदळी येण्याचा धोका असतो़ यामुळे शक्यतो वाहत्या पाण्यात मूर्ती विसर्जित करणे योग्य राहिल़ दुपारी चार वाजेनंतर कधी गणेश मूर्ती विसर्जन केले जाऊ शकते़
-मधुकर जोशी, ज्येष्ठ पुरोहित, नंदुरबाऱ