Illegal liquor seized in three rickshaws near Navapura | नवापुराजवळ तीन रिक्षांमधून साडेचार लाखाचे अवैध मद्य जप्त
नवापुराजवळ तीन रिक्षांमधून साडेचार लाखाचे अवैध मद्य जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : नवापुर तालुक्यातून गुजरात राज्यात होणाऱ्या अवैध मद्याच्या तस्करीला रोखण्यात एलसबीच्या पथकाला यश आले असून वाकीपाडा ता़ नवापुर गावाजवळ मंगळवारी रात्री उशिरा साडेचार लाखाचे अवैध मद्य जप्त करण्यात आले़ तीन आॅटो रिक्षातून हा साठा ताब्यात घेण्यात आला. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ही कारवाई करण्यात आली.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्याच्या सिमेवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. त्या अंतर्गतच ही कारवाई करण्यात आली. नवापुर तालुक्यातून गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणावर विनापरवाना मद्याचा पुरवठा होत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती़ मिळालेल्या माहितीवरुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी पथकासह मंगळवारी वाकीपाडा पुलाजवळ सापळा रचला होता़ दरम्यान नवापुरकडून गुजरात राज्यात ३ आॅटो रिक्षा भरधाव वेगाने जात असल्याचे पथकाला दिसून आले़ कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबण्याचे सांगितल्यानंतर रिक्षाचालकांना पळ काढला़
पथकाने वाहनाद्वारे पाठलाग करुन रिक्षा थांबवल्या़ यावेळी रिक्षाचालकांची चौकशी केली असता, त्यांनी शोएब गुलाब बाबरिया, अकिल शेख महंमद आणि शेख साबीर शेख सत्तार अशी नावे सांगितली़ त्यांना वाहनातील मुद्देमालाबाबत चौकशी केली असता, उडवाउडवीची उत्तरे दिली़ पोलीस पथकाने तपासणी केली असता, देशी विदेशी अवैध दारु व बियर मिळून आल्यानंतर तिघांना ताब्यात घेण्यात आले़
रिक्षांमधून १ लाख २ हजार ३३६ रुपयांच्या देशी मद्याच्या १७६८ बाटल्या, ४६ हजार ३७६ रुपयांचे विदेशी मद्य, २६ हजार ४०० रुपयांचे बियरचे २१६ टीन, एक लाख ८५ हजार रुपयांच्या (जीजे २१ टी ४४०, जीजे १९ यू ७०७२, जीजे १९ यू ५७२९) या तीन रिक्षा असा एकूण चार लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र नगराळे, शांतीलाल पाटील, युवराज चव्हाण, जितेंंद्र तोरवणे, यशोदीप ओगले यांच्या पथकाने केली़

Web Title: Illegal liquor seized in three rickshaws near Navapura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.