शेहीनजीक ट्रॅक्टर अपघातात आई-लेक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 13:37 IST2020-11-24T13:37:36+5:302020-11-24T13:37:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापूर तालुक्यातील शेही ते मरोड रस्त्यादरम्यान भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रॅक्टरचे चाक रस्त्यावरील खड्ड्यामध्ये ...

शेहीनजीक ट्रॅक्टर अपघातात आई-लेक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : नवापूर तालुक्यातील शेही ते मरोड रस्त्यादरम्यान भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रॅक्टरचे चाक रस्त्यावरील खड्ड्यामध्ये आदळले. यावेळी ट्रॅक्टरमधील मुलगी व तिची आई ट्रॅक्टरमधून खाली जोरात फेकल्या गेल्याने या अपघातात त्या जागीच ठार झाल्याची घटना घडली. यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलीस सूत्रानुसार, शेही गावाहून देवमोगरा येथे आकाश हिरालाल वसावे हा त्याची पत्नी योगीता आकाश वसावे (२३) व मुलगी प्रणवी आकाश वसावे (४) (सर्व रा.देवमोगरा) यांना ट्रॅक्टरमध्ये बसवून देवमोगरा या गावी घेऊन जात होता. भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालवत असताना शेही ते मरोड गावाच्या दरम्यान ट्रॅक्टरचे चाक एका खड्ड्यात आदळले. त्यामुळे ट्रॅक्टरमध्ये बसलेली त्याची पत्नी योगीता वसावे व मुलगी प्रणवी वसावे ह्या ट्रॅक्टरवरुन रस्त्याच्या बाजूला फेकले गेले.
या अपघातात दोघी जागीच ठार झाल्या. याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात राजू भरत वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक आकाश हिरालाल वसावे याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवलदार नरेंद्र वळवी करीत आहे.
ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून दररोज लहान-मोठे अपघात होत असतात. त्यात अनेकांनी आपले प्राण गमावले असून अनेकांना अपंगत्व आलेले आहे. संबंधित विभागाने ग्रामीण भागातील रस्त्यांकडे लक्ष देऊन ते दुरुस्त करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.