अहो दादा...लग्न समारंभात कशी करता येईल हाैस-माैज; जिथे नवरा-नवरीला खांद्यावर घेत निघते वऱ्हाडींची फाैज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 14:38 IST2025-05-20T14:38:34+5:302025-05-20T14:38:54+5:30
खुर्चीमाळ येथे चिवलउतार येथील नवरदेव वऱ्हाड घेऊन आला होता. दुपारी १२ वाजता सांगोबारपाडा गावापर्यंत येऊन तेथून पुढे दोन किलोमीटर रस्ता नसल्याने दरीखोऱ्यासह डोंगरातून पायपीट करत वऱ्हाड खुर्चीमाळ येथे पोहोचले.

अहो दादा...लग्न समारंभात कशी करता येईल हाैस-माैज; जिथे नवरा-नवरीला खांद्यावर घेत निघते वऱ्हाडींची फाैज
वाण्याविहीर (जि. नंदुरबार) : सातपुड्यातील गावांमध्ये मूलभूत सुविधा नसल्याने लग्नसाेहळ्याच्या आनंदावरही विरजण पडत आहे. यामुळे लग्नात हाैस-माैज करण्याच्या वेळेत नवरदेव-नवरीला थेट खांद्यावर घेत पायपीट करण्याची वेळ वऱ्हाडींवर आली आहे. अक्कलकुवा तालुक्यात खुर्चीमाळ येथे विवाहासाठी जाणाऱ्या वऱ्हाडाला पायपीट करत गावी पोहोचावे लागते. तेथून नवरदेव-नवरीला दोन किलोमीटर पायपीट करत खांद्यावरून आणावे लागत आहे.
खुर्चीमाळ येथे चिवलउतार येथील नवरदेव वऱ्हाड घेऊन आला होता. दुपारी १२ वाजता सांगोबारपाडा गावापर्यंत येऊन तेथून पुढे दोन किलोमीटर रस्ता नसल्याने दरीखोऱ्यासह डोंगरातून पायपीट करत वऱ्हाड खुर्चीमाळ येथे पोहोचले. विवाह समारंभ आटोपून वर आणि वधूने एकमेकांसोबत सात जन्माची गाठ बांधली अन् वऱ्हाड परतीला निघाले. रिवाज आणि परंपरेनुसार लग्नानंतर नवदाम्पत्याला मिरवले जाते. परंतु, सांगोबारपाडा गावापर्यंत रस्ता नसल्याने वऱ्हाडींनीच नवरदेव आणि नवरीला खांद्यावर घेत पायपीट सुरू केली.
वर्षानुवर्षे हाल
खुर्चीमाळ गावाला रस्ता नसल्याने येथे पाहुणे येण्याचेही टाळतात. अक्कलकुवा तालुक्यातील चिवलउतार, नेंदवण, ओरपा ते खुर्चीमाळ या मार्गावर दोन किलोमीटर अंतराचा रस्ताच नसल्याने त्या मार्गाने कोणी जाऊ शकत नाही.
मोठा फेरा करून वऱ्हाडी मंडळीला यावे लागते. वर्षानुवर्षे कायम असलेल्या या समस्येवर जिल्हा प्रशासन मार्ग काढणार तरी कधी, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.