गृहकर्ज व मुद्रा लोनसाठी हेलपाटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:21 IST2021-01-13T05:21:56+5:302021-01-13T05:21:56+5:30
सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत बऱ्याच जणांनी गृहकर्ज व मुद्रा लोनसाठी प्रकरणे दाखल केलेली ...

गृहकर्ज व मुद्रा लोनसाठी हेलपाटे
सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत बऱ्याच जणांनी गृहकर्ज व मुद्रा लोनसाठी प्रकरणे दाखल केलेली आहेत. ही प्रकरणे देऊन अनेक महिने झाले. मात्र, अद्याप ग्राहकांना कर्ज मिळविण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. याबाबत बँकेत विचारणा केली असता प्रकरणांची फाइल धुळ्याला गेली आहे. त्यामुळे उशीर होत असल्याचे नेहमी सांगितले जाते. केंद्र शासनाने तरुणांनी सुशिक्षित बेरोजगार राहू नये यासाठी मुद्रा लोन योजना सुरू केली आहे. भाजीपाला विक्रेते, सलून व्यावसायिक, चहाचे दुकान, फेरीवाले आदींनाही मुद्रा लोन दिले जाते. सुशिक्षित तरुण बेरोजगार न राहता मुद्रा लोनद्वारे आपला व्यवसाय करीत आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन पोटाची खळगी भरू शकतील, यासाठी मुद्रा लोन योजना सुरू केली आहे. मात्र, बँकेचे अधिकारी मनमानी करून मुद्रा लोन देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची तक्रार संबंधित लाभार्थींकडून होत आहे.
गृहकर्जासाठीही टोलवाटोलवी
या बँकेमध्ये बऱ्याच जणांनी गृहकर्जासाठीही प्रकरणे टाकली आहेत. योग्य त्या कागदपत्रांची पूर्तताही केली आहे. मात्र, पाच-सहा महिने होऊनही त्यांना गृहकर्ज भेटत नाही. माहिती घेण्यासाठी बँकेत गेले असता फाइल धुळ्याला गेली आहे, असे सांगण्यात येते. धुळे येथील बँकेच्या शाखेत संपर्क केला असता आपण आपल्या शाखेत संपर्क करा, असे सांगण्यात येते. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पात्र ग्राहकांना मुद्रा लोन व गृहकर्ज का दिले जात नाही, याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कर्ज प्रकरणांबाबत प्रकाशा येथील बँकेच्या शाखेतून कोणतीही अडचण नाही. आम्ही सर्व फायली पूर्ण करून धुळे येथील मुख्य शाखेत पुढील कार्यवाहीसाठी पाठविल्या आहेत.
-हरीश पाडवी, व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक, प्रकाशा शाखा.