आरोग्य कर्मचारी महासंघाचा उपोषणाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:28 IST2021-01-22T04:28:54+5:302021-01-22T04:28:54+5:30
१४ नोव्हेंबर २०२० रोजी खासदार डॉ. हीना गावीत यांच्या नेतृत्वाखाली व महासंघाचे नेते डॉ. कांतीलाल टाटिया यांच्या मार्गदर्शनाखाली महासंघाने ...

आरोग्य कर्मचारी महासंघाचा उपोषणाचा इशारा
१४ नोव्हेंबर २०२० रोजी खासदार डॉ. हीना गावीत यांच्या नेतृत्वाखाली व महासंघाचे नेते डॉ. कांतीलाल टाटिया यांच्या मार्गदर्शनाखाली महासंघाने जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा केली असता जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पुढील मागण्या मान्य केल्या होत्या. त्यात आरोग्य सेवकांना आरोग्य सहायकपदी, आरोग्यसेविका यांना आरोग्य सहायिकापदी तसेच आरोग्य सहायक व आरोग्य सहायिका यांना आरोग्य विस्तार अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात यावी. १० वर्षे, २० वर्षे व ३० वर्षे सेवा झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती योजनेचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने मिळावा, वेतन देण्याच्या कायद्यानुसार सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा नियमित व वेळेवर एक तारखेस अदा करण्यात यावे, या कामी कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वर्षानुवर्षांपासून प्रलंबित व दुर्लक्षित असलेल्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा होऊन संबंधितांना न्याय द्यावा यासह इतर मागण्यांचा समावेश होता. या सर्व मंजूर झालेल्या मागण्यांची अंमलबजावणी होऊन त्याचा प्रत्यक्ष लाभ कर्मचाऱ्यांना मिळावा यासाठी महासंघाने जिल्हा आरोग्य अधिकारी यांना वारंवार निवेदने देऊन व प्रत्यक्ष भेटून बऱ्याचवेळा चर्चाही केली. मात्र अंमलबजावणी होत नसल्याने महासंघातर्फे १० फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करणार असल्याची नोटीस जिल्हा परिषद प्रशासनाला दिलेली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणी करण्याची मागणी आरोग्य कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष हर्षल मराठे, सरचिटणीस राहुल माळकर, चिटणीस सतीश जाधव, विशाल मोघे, नितीन पवार, निखिल तुपे, गणेश खेडेकर, नितीन बोरसे आदी पदाधिकाऱ्यांनी जि.प. प्रशासनाला केली आहे.