अकरावीच्या प्रवेशासाठी शाळा व शिक्षकांची डोकेदुखी वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:35 IST2021-08-14T04:35:56+5:302021-08-14T04:35:56+5:30
दरवर्षी अकरावीच्या प्रवेशासाठी विशेषत: विज्ञान शाखेतील प्रवेशासाठी सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची झुंबड उडते. अनेक विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेकडेच जास्त ...

अकरावीच्या प्रवेशासाठी शाळा व शिक्षकांची डोकेदुखी वाढणार
दरवर्षी अकरावीच्या प्रवेशासाठी विशेषत: विज्ञान शाखेतील प्रवेशासाठी सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची झुंबड उडते. अनेक विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेकडेच जास्त असल्याने अकरावी विज्ञानसाठी दहावीत मिळालेल्या गुणांच्या निकषाप्रमाणे प्रवेश दिला जात असे. तरीही दहावीत कमी गुण मिळणारे काही विद्यार्थी व त्यांचे पालक अकरावी विज्ञान शाखेसाठीच आग्रह धरत असल्यामुळे संस्था चालकांच्या मध्यस्थीने किंवा डोनेशन घेऊन प्रवेश दिला जात असे. यंदा मात्र कोरोनामुळे दहावीच्या परीक्षाच न झाल्याने शाळांनीच विद्यार्थ्यांच्या नववीचे गुण व दहावीच्या वर्षभराच्या कामकाजाचे मूल्यांकन करून दहावीचे निकाल तयार केले असल्याने सर्वच शाळांच्या सर्वच विद्यार्थ्यांना दहावीत रेकॉर्डब्रेक गुण मिळाले आहेत. नववीपर्यंत ‘ड’ असणाऱ्या विद्यार्थ्यालाही यंदा दहावीत ८० ते ९० टक्के गुण मिळाले आहेत. आतापर्यंत ज्या शाळांचे दहावीचे निकाल ५० ते ६० टक्क्यांच्या पुढे कधीही गेले नाहीत अशा शाळांचे निकालही १०० टक्के लागल्याने यंदा अकरावी विज्ञान प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडणार आहे.
यंदा दहावीच्या परीक्षेसाठी तालुक्यातून पाच हजार ३५४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर तालुक्यात २२ कनिष्ठ महाविद्यालये असून, फक्त पाच हजार ८० जागा आहेत. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या जास्त आणि अकरावीच्या जागा कमी अशी परिस्थिती असल्याने आता अकरावीचे प्रवेश कसे होतात याची उत्सुकता विद्यार्थी व पालकांना आहे. दहावीत उत्तीर्ण झालेल्या पाच हजार ३५४ विद्यार्थ्यांमध्ये एक हजार ७५० विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत, तर तीन हजार २६६ प्रथम श्रेणीत आणि ३३० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विशेष प्रावीण्यासह, प्रथम श्रेणी व द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेल्यांची एकूण संख्या पाच हजार ३४६ आहे आणि तालुक्यात विज्ञान शाखेच्या जागा फक्त दोन हजार ८८० आहेत. त्यामुळे अकरावी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी शाळांची आणि शिक्षकांची डोकेदुखी वाढणार आहे. अकरावी प्रवेशासाठी सी.ई.टी. झाली असती तर सी.ई.टी.त मिळालेल्या गुणांप्रमाणे प्रवेश देऊन काही प्रमाणात प्रवेशाला कात्री लावता आली असती. परंतु, आता सर्वच विद्यार्थ्यांना दहावीत भरघोस गुण असल्याने प्रवेशाचे मेरीटही जास्त जाऊन सर्वच विद्यार्थी प्रवेशासाठी दावे करू शकतात. अकरावीच्या प्रवेशासाठी विशेषत: विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी सर्वच शाळांना काही ठोस निर्णय घ्यावे लागतील. प्रवेशाची डोकेदुखी कमी करण्यासाठी काही उपाययोजना कराव्या लागतील. यात शाळास्तरावर सी.ई.टी.चे आयोजन करता येऊ शकेल. परंतु यासाठी पुन्हा शिक्षण विभागाची परवानगी घ्यावी लागेल. एकंदरीतच अकरावी विज्ञान शाखेचा प्रवेशाचा मार्ग सुखकर होण्यासाठी शाळा, संस्थाचालक व शिक्षक यांना शिक्षण विभागाच्या परवानगीनेच योग्य उपाययोजना राबवावी लागेल.
कला शाखेला चांगले दिवस येणार
यंदा अकरावीच्या विज्ञान शाखेच्या प्रवेशाच्या अडचणी वाढणार असल्या तरी दुसरीकडे मात्र अकरावी कला शाखेला चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा आहे. दरवर्षी अकरावी कला शाखेच्या प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना गावोगावी विद्यार्थ्यांची शोधाशोध करावी लागत होती. यंदा मात्र सर्वच शाळांचे निकाल १०० टक्के लागल्याने कला शाखेच्या प्रवेशासाठी होणारी शिक्षकांची भटकंती थांबणार आहे.
शिक्षणाचा खेळखंडोबा थांबवावा : पालकांची मागणी
दहावीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी अकरावीची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू न झाल्याने विद्यार्थी व पालकांना अकरावीचे प्रवेश कधी सुरू होतात याची प्रतीक्षा लागून आहे. अकरावी प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण होण्यात किमान १५ ते २० दिवसांचा कालावधी जाणार असल्याने अकरावीचे वर्ग कधी सुरू होतील हादेखील प्रश्नच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाल्याने गेल्या दीड वर्षापासून बंद झालेल्या शाळा पूर्ववत सुरू करून शिक्षणाचा खेळखंडोबा थांबवावा, अशी पालकांची मागणी आहे.
दहावीत उत्तीर्ण विद्यार्थी संख्या- पाच हजार ३५४
विशेष प्रावीण्यासह (डिस्टिंक्शन)- एक हजार ७५०
प्रथम श्रेणी- तीन हजार २६६,
द्वितीय श्रेणी- ३३०,
पास क्लास- ८
तालुक्यात एकूण कनिष्ठ महाविद्यालय- २२
अकरावी प्रवेश क्षमता-
कला शाखा - दोन हजार १२०,
विज्ञान शाखा - दोन हजार ८८०,
वाणिज्य शाखा- १६०