लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वाळू वाहतुकीच्या भरधाव वाहनांवर कुणाचाही वचक नसल्याचे पुन्हा एकदा नांदरखेडा फाट्याजवळील अपघाताने स्पष्ट झाले आहे. डंपरमध्ये वाळू भरलेले नसले तरी ते वाळू वाहतुकीचेच असल्याचे चौकशीत समोर आले आहे. दरम्यान, या अपघातात दोन युवकांचा बळी गेल्याने नांदरखेडा व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गुजरातमधून नंदुरबारमार्गे नाशिक, मुंबई, औरंगाबाद या भागात मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक केली जाते. त्यासाठी अवजड वाहनांचा वापर केला जातो. डंपरचे प्रमाण सर्वाधिक आहे. ही वाहने भरधाव जात असल्यामुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. बुधवारी पहाटे झालेली घटना देखील त्याचेच परिपाक असल्याचे बोलले जात आहे. साक्रीकडून नंदुरबारकडे जाणाऱ्या भरधाव डंपरने रस्त्याच्या कडेला असलेल्या घरावर थेट धडक दिली. घराबाहेर खाटेवर झोपलेल्या दोन युवकांचा त्यात हकनाक बळी गेला. त्यातील प्रवीण राठोड हा युवक औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात शिकत होता. त्याची सद्या परीक्षा सुरू आहे. रात्री उशीरापर्यंत त्याने अभ्यास केला. झोपी गेल्यानंतर काही तासातच काळाने त्याच्यावर घाला घातला. दुसरा युवकही महाविद्यालयत शिकत होता. या युवकांच्या हकनाक बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.या अपघातात दोन म्हशी व पाच शेळ्यांचा देखील बळी गेला आहे. याशिवाय तेथे उभी असलेली दुचाकीही डंपरखाली चिरडली गेली आहे. या अपघातात बळी तर गेले परंतु लाखो रुपयांचे देखील नुकसान झाले आहे. सकाळी संतप्त गावकरी घटनास्थळी जमा झाले. त्यांनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी वेळीच त्यांची समजून घातल्याने अनर्थ टळला. पोलिसांनी डंपर जप्त केले आहे.
दोन विद्यार्थ्यांचा हकनाक बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 12:47 IST