ग्रामपंचायत निवडणूक सोशल मीडियावर व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:24 IST2021-01-10T04:24:33+5:302021-01-10T04:24:33+5:30
तालुक्यात ग्रामीण भागात येत्या १५ तारखेला ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपापली तयारीही जोरात सुरू केली ...

ग्रामपंचायत निवडणूक सोशल मीडियावर व्हायरल
तालुक्यात ग्रामीण भागात येत्या १५ तारखेला ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपापली तयारीही जोरात सुरू केली आहे. यातच पक्षात असलेले वाद-विवाद चव्हाट्यावरदेखील आले आहेत. अशात छोटे-मोठे राडेदेखील पाहायला मिळत आहे. दरम्यान, ग्रामीण भागात होऊ घातलेली निवडणूक ही नात्या गोत्याच्या प्रचाराने चुरशीची ठरत आहे. यावेळी होऊ घातलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत तालुक्यातील सारंगखेडा, कुकावल, कोठलीतर्फे सारंगखेडा, बामखेडा, मोहिदा, सोनवदतर्फे शहादा, सारंगखेडा या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ग्रामपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुका नंदुरबार विधानसभा मतदार संघातील असल्यामुळे प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांसोबत राजकीय नेत्यांनी या निवडणुका जिंकण्याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत.
गेल्या आठ महिन्यांपासून कोविड-१९ या संसर्गजन्य महामारीच्या आजारापासून सुस्त झालेले अनेक कार्यकर्ते हे निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराला युद्धभुमीप्रमाणे सुरू झालेले आहेत. दिवस-रात्र उमेदवारांचे प्रचार सुरू आहेत. उमेदवारांनी प्रचाराच्या सुरुवातीस आपापले श्रद्धास्थान असलेल्या देवाच्या पुढे श्रीफळ फोडून व पेढ्यांचे वाटप करून प्रचाराचा प्रारंभ केला आहे.
शहादा तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मजूर वर्गाने महाराष्ट्रासह, गुजरात व मध्य प्रदेशात स्थलांतर केले आहे. गेल्या तीन महिने अगोदर झालेले आहे. अचानक निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यामुळे उमेदवार व कार्यकर्त्यांना मतदारांशी संपर्क करण्याकरिता भ्रमणध्वनीचा वापर सुरू केलेला आहे. काही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत. या परिसरातून हजाराेच्या संख्येने मजूर मजुरीकरिता परराज्यात गेले असून, त्यांना परत आणण्याकरिता उमेदवारांकडून आतापासूनच फिल्डिंग लावण्यात येत आहे. यासोबत ग्रामीण भागातील अनेक सुशिक्षित मतदार मोठ्या शहरात नोकरीनिमित्त स्थायिक झाले असून, त्यांनादेखील मतदानाच्या दिवशी उपस्थित राहण्याकरिता संपर्क करण्यात येत आहे. या निवडणुका मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जात आहेत.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कुटुंबातील उमेदवारच आता परस्पर विरोधात निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे निवडणुका चुरशीच्या ठरणार आहे. राजकीय पक्षांचे चिन्ह नसले तरी अप्रत्यक्षरीत्या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रचाराला जोरदार सुरुवात करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गावातील रस्ते, पाणी, आरोग्य, स्वच्छता व शिक्षण या विषयांना घेऊन प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. यावेळेस पुरुषांच्या बरोबर महिलांचीदेखील उमेदवारी संख्या बरोबरीची असल्याने महिलादेखील सकाळपासून आपापल्या घरातील सर्व कामे आटपून घरोघरी मतदारांशी संपर्क करून मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.