‘कोरोना को हराना’चे उद्दीष्ट येऊ लागले हळूहळू दृष्टीपथात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 13:00 IST2020-10-10T13:00:27+5:302020-10-10T13:00:35+5:30
मनोज शेलार। लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘कोरोना को हराना’ या कोरोनाच्या टॅगलार्ईनप्रमाणे जिल्ह्यात कोरोनाला हळूहळू हरविणाची तयारी सुरू ...

‘कोरोना को हराना’चे उद्दीष्ट येऊ लागले हळूहळू दृष्टीपथात!
मनोज शेलार।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ‘कोरोना को हराना’ या कोरोनाच्या टॅगलार्ईनप्रमाणे जिल्ह्यात कोरोनाला हळूहळू हरविणाची तयारी सुरू झाल्याचे गेल्या आठ दिवसांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. रुग्ण संख्येचा वाढीचा दर हा ३० ते ४० टक्यांनी कमी झाला आहे. मृत्यूदर देखील कमी झाला असून कोरोनामुक्त होणाऱ्यांची टक्केवारी वाढली आहे. याला विविध कारणे दिली जात आहे. वास्तविक सर्व व्यवहार सुरळीत सुरू झालेले असतांना हे शुभचित्र समोर येत असल्यामुळे लोकांच्या मनातील भितीही कमी होऊ लागली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण १८ एप्रिल रोजी आढळून आल्यापासून लोकांच्या मनातील भिती प्रचंड वाढली ती आतापर्यंत टिकून होती. शासन, प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्या, लोकांमध्ये जागृती आणली तरी भिती दूर होत नव्हती. अनेकांना तर केवळ लक्षणे आढळल्याच्या धक्यानेच त्यांचा जीव गेल्याचेही उदाहरणे आहेत. असा हा कोरोना आता आपली वेग कमी करू लागल्याची चिन्हे आहेत. आॅक्टोबरच्या पहिल्या दिवसापासून ते चित्र दिसून येऊ लागले आहे.
विविध कारणे
जिल्ह्यात कोरोना कमी होण्याची विविध कारणे असल्याचे चर्चिले जात आहे. त्यात मुख्यत्वे नागरिकांमधील जनजागृती व घेतली जाणारी काळजी, लोकांमधील वाढलेली ह्युमिनीटी, कोरोना विषाणुचा कमी झालेला प्रभाव आणि स्वॅब देणाऱ्यांची कमी झालेली संख्या हे कारणे असल्याचे चर्चिले जात आहे.
आॅगस्टमध्ये वाढले दुप्पट मृत्यू
आॅगस्ट महिन्यात मृत्यूची संख्या दुप्पट झाली होती. जुलै अखेरीस ३१ मृत्यूसंख्या असतांना आॅगस्ट अखेर ती ७४ झाली होती. तर सप्टेंबर अखेर १२४ वर गेली होती. त्यापूर्वी अर्थात एप्रिल महिन्यात एक, मे महिन्यात दोन, जून महिन्यात तीन जणांचा मृत्यू झाला होता.
धोका टळलेला नाही
कोरोनाचा धोका मात्र अद्यापही टळलेला नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ आणि प्रशासनाचे म्हणने आहे. वातावरणातील बदल आणि त्यामुळे विषाणूवर झालेला परिणाम हे सद्य स्थितीत कारण असले तरी हिवाळा सुरू होताच पुन्हा कोरोना डोके वर काढण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने दक्ष राहणे आवश्यक आहे. सद्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, हॉटेल, मॉल्स उघडले आहेत. त्यामुळे संपर्क वाढून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची भिती असल्याचे तज्ज्ञांचे म्हणने आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे पहिले तीन महिने वेग कमी होता. अर्थात चाचण्या कमी झाल्याने हा वेगही मर्यादीत होता. जुलैपासून मात्र त्यात काही प्रमाणात वाढ झाली. आॅगस्टच्या दुसºया आठवड्यापासून स्थानिक ठिकाणी आरटीपीसीआर चाचण्या सुरू झाल्या आणि रुग्ण वाढीचा वेग कमालीचा वाढला. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात केवळ १८ रुग्ण होते. मे महिन्यात त्यात १६ ची वाढहोऊन ते ३४ झाले. जून महिन्यात मात्र रुग्णसंख्या चार पटीने वाढून ती १६३ वर पोहचली. जुलै महिन्यात पुन्हा साडेतीन पटीने वाढून रुग्णसंख्या ५४७ पर्यंत गेली. आॅगस्ट महिन्यात पाच पटीने वाढून रुग्णसंख्या ही दोन हजार ६०५ पर्यंत पोहचली. तर सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस हीच संख्या दुप्पट वाढून पाच हजाराचा आकडा पार करून गेली. सद्य स्थितीत साडेपाच हजाराचा टप्पा पार करून गेली आहे.